Exam | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

सीबीएसई बोर्डाकडून (CBSE Board) देण्यात आलेल्या माहितीनुसार यंदा 10वी,12वीच्या बोर्डाच्या परीक्षा दोन सत्रात होणार आहेत. त्यामुळे यंदाच्या या निर्णयानंतर विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष परीक्षांच्या तारखांकडे लागले आहे. मागील काही दिवसांपासून परीक्षा तारखांबाबत चर्चा सुरू होती आता अखेर सीबीएसई बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, 10वी,12वीच्या विद्यार्थ्यांच्या टर्म 1 च्या परीक्षा तारखा (CBSE Board Exam Term 1 Date Sheet) 18 ऑक्टोबरला जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. या टर्म 1 च्या परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबर 2021 मध्ये होणार आहेत. या परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात असणार आहेत. प्रत्येक विषयासाठी 90 मिनिटांचा परीक्षा कालावधी असेल. नक्की वाचा:  CBSE Board Revised Syllabus Update: 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित अभ्यासक्रम जाहीर; cbseacademic.nic.in वर पहा Term Wise Syllabus.

यंदा परीक्षा पॅटर्नमध्ये करण्यात आलेला बदल म्हणजे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करणं सुकर जावं म्हणून विषय हे मायनर आणि मेजर सब्जेक्ट असे विभागले गेले आहेत. सीबीएसई बोर्ड 189 विषयांची परीक्षा घेते. 10वी,12वीच्या विद्यार्थ्यांची एकाच वेळी परीक्षा घेतली तर त्यासाठी 40-45 दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे यंदा बोर्ड पहिल्यांदा मायनर विषयांच्या आणि नंतर मेजर विषयांच्या परीक्षा घेतील.

मेजर विषय हे बहुतांशी शाळेमध्ये असतात म्हणून त्यांच्या परीक्षा तारीख ठरवून पहिल्याप्रमाणे घेतल्या जातील पण मायनर विषयांमध्ये आता सारख्या विषयांच्या शाळा एकत्र करून एकाच दिवशी त्या ठिकाणी परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

टर्म 2 च्या परीक्षा मार्च-एप्रिल 2022 मध्ये पार पडणार आहेत. टर्म 2 मध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह अशा दोन्ही स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत. मागील वर्षी कोरोना संकटामुळे 10वी,12वीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या आणि अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने निकाल लावण्यात आला होता. यंदा हा गोंधळ टाळण्यासाठी बोर्डाला 2021-22 च्या परीक्षा दोन टर्म मध्ये विभागण्याचा निर्णय झाला आहे. अनेक राज्यात स्टेट बोर्डांनी देखील हाच सीबीएससी मॉडेलचा पर्याय निवडण्याचं ठरवलं आहे.