Students (PC - Twitter)

किंग चार्ल्स तिसरा (King Charles III) यांनी स्थापन केलेल्या ‘ब्रिटीश एशियन ट्रस्ट’ (British Asian Trust) या धर्मादाय संस्थेने भारतातील 4 दशलक्ष मुलांच्या जीवनावर प्रभाव टाकण्यासाठी एका महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात पुढाकार घेतला आहे. ही संस्था एका शैक्षणिक उपक्रमाचे नेतृत्व करत आहे, ज्यामुळे पाच वर्षांत भारतातील चाळीस लाख मुलांचे जीवन बदलेल. LiftEd असे या उपक्रमाचे नाव आहे. या उपक्रमाचा उद्देश भारताच्या शैक्षणिक परिसंस्थेला बळकट करणे हा आहे. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला.

LiftEd हा उपक्रम सार्वजनिक शाळांमधील इयत्ता 1-3 मधील विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करतो, ज्याद्वारे भारतातील मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र (FLN) वाढविण्याच्या उद्देशाने शिक्षण तज्ञांच्या विविध गटांना एकत्र आणले जात आहे. या उपक्रमाने ॲटलासियन फाऊंडेशन, ब्रिजेस आउटकम पार्टनरशिप्स, मायकल अँड सुसान डेल फाऊंडेशन, रिलायन्स फाऊंडेशन, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, यूबीएस ऑप्टिमस फाउंडेशन आणि यूएसएआयडी यासारख्या प्रभावशाली संस्थांसह 26 भागीदारांच्या कन्सोर्टियमकडून USD 20 दशलक्ष (166 कोटी रुपये) पर्यंत निधी यशस्वीपणे प्राप्त केला आहे.

भारत सरकारने FLN ला शिकण्याची एक महत्त्वाची पूर्वतयारी म्हणून मान्यता दिल्याने, हा उपक्रम 2021 ‘निपुण भारत मिशन’शी संरेखित झाला आहे, ज्याचे उद्दिष्ट 4-10 वयोगटातील प्रत्येक मुलाला 2026-27 पर्यंत FLN कौशल्यांनी सुसज्ज करणे हे आहे. सध्या LiftEd चे ऑन-ग्राउंड शैक्षणिक भागीदार हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश आणि बिहार या पाच भौगोलिक प्रदेशांमध्ये सक्रियपणे काम करत आहेत. (हेही वाचा: Coaching Centre Guidelines: 'कोचिंग संस्थांमध्ये 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही'; सरकारने जारी केली नवीन मार्गदर्शक तत्वे)

याव्यतिरिक्त, LiftEd ने भारतातील कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी FLN वाढविण्यासाठी डिजिटल सोल्यूशन्स विकसित करण्याच्या उद्देशाने एक EdTech Accelerator ही सादर केला आहे. किंग चार्ल्स तृतीय प्रिन्स ऑफ वेल्स असताना त्यांनी 2007 मध्ये ब्रिटिश एशियन ट्रस्टची स्थापन केली होती. या संस्थेने दक्षिण आशियातील गरिबी, असमानता आणि अन्याय दूर करण्यासाठी सातत्याने काम केले आहे.