बनारस हिंदू विद्यापीठ (संग्रहित संपादित प्रतिमा)

बनारस हिंदू विद्यापीठाचे (Banaras Hindu University) आयुर्वेद विज्ञान विभाग भूत विज्ञानाबाबत (Science Of Paranormal) सहा महिन्यांचा डिप्लोमा कोर्स सुरू करणार आहे. त्याअंतर्गत मानसिक आजार दूर करण्यावर भर दिला जाईल. भूत विज्ञान हा  एक मानसोपचार आहे. या कोर्समध्ये, डॉक्टरांना मनोरुग्णांचे विकार आणि असामान्य कारणांमुळे होणारी असामान्य मानसिक परिस्थितीचा उपचार करण्यासाठी, उपचार आणि मनोचिकित्सा विषय शिकवले जातील. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी भुतामुळे होतात असा अनेकांचा विश्वास आहे. मात्र आता यावरील वैज्ञानिक कारण समोर आणण्याचे प्रयत्न होतील. हा कोर्स जानेवारी 2020 पासून सुरु होणार आहे.

या कोर्सची फी 50,000 पर्यंत असू शकते. आयुर्वेद विद्याशाखेचे डीन यामिनी भूषण त्रिपाठी यांच्या म्हणण्यानुसार, 'या अभ्यासक्रमासाठी गुणवत्तेच्या किंवा लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवार प्रवेश घेऊ शकतो. याबाबत डॉक्टरांना औपचारिक शिक्षण देण्यासाठी आयुर्वेद संकुलात भूत विज्ञानाचे स्वतंत्र युनिट तयार केले गेले आहे.' उमेदवारांची संख्या जास्त असल्यास लेखी परीक्षा होईल. वर्षभरात या अभ्याक्रमाच्या दोन बॅचेस असतील. प्रत्येक बॅचमध्ये 10 विद्यार्थी असतील. वैद्यकीय विज्ञान पदवीधर या अभ्यासक्रमासाठी प्रेवश घेऊ शकतात. तसेच एमबीबीएस आणि बीएससी नर्सिंग पास विद्यार्थ्यांनाही यासाठी प्रवेश घेता येणार आहे. (हेही वाचा: ही आहेत भारतातील शापित पर्यटनस्थळे; पुण्यातील हे भुताटकी ठिकाण तर आहे जगप्रसिद्ध)

इथे आयुर्वेदिक चिकित्सा व शस्त्रक्रिया (बीएएमएस) आणि बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (एमबीबीएस) पदवी धारकांना, 'भूता'मुळे होणाऱ्या मानसिक व्याधी आणि आजारांवर उपचार शिकवले जातील. भूत विद्या अष्टांग आयुर्वेदाच्या आठ मूलभूत शाखांपैकी एक आहे. हे प्रामुख्याने मानसिक विकार, अज्ञात कारणे आणि मनाच्या आजारांशी किंवा मानसिक परिस्थितीशी संबंधित आहे. बीएचयू येथील आयुर्वेद विद्याशाखा ही बॅचलर्सचे स्वतंत्र युनिट तयार करणारे आणि या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम डिझाइन करणारी देशातील पहिली विद्याशाखा आहे.