2022 पर्यंत IT क्षेत्रातील 30 लाख लोकांची नोकरी जाण्याची शक्यता; Bank of America च्या अहवालाने खळबळ
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

देशातील कोरोना विषाणू (Coronavirus) संकटामुळे जवळजवळ प्रत्येक क्षेत्रावर वाईट परिणाम झाला आहे. एकीकडे देशात अजूनही ही महामारी ठाण मांडून बसली आहे तर दुसरीकडे, बर्‍याच मोठ्या कंपन्या व व्यवसायिक आर्थिकदृष्ट्या या साथीच्या आजाराला बळी पडले आहेत. या काळात बर्‍याच लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत तर अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. आता आयटी क्षेत्रातील (IT Sector) नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. मात्र याचे कारण ‘ऑटोमेशन’ (Automation) हे आहे. 2022 पर्यंत ऑटोमेशनचा स्वीकार करणाऱ्या आयटी कंपन्यांमध्ये 30 लाख रोजगार कमी होणार असल्याची बातमी आहे.

सध्या कंपन्या 10 कर्मचार्‍यांना घेण्याऐवजी ऑटोमेशन टेक्नॉलॉजीचा अवलंब करून फक्त एका रोबोटद्वारे काम पूर्ण करत आहेत, त्यामुळेच आयटी क्षेत्रातील लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे. बँक ऑफ अमेरिकाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. देशातील आयटी क्षेत्रात सध्या 1.6 कोटी लोक काम करतात. अशा परिस्थितीत कंपन्यांनी 30 लाख लोकांना काढून टाकल्यास, पगाराच्या स्वरूपात त्यांची वार्षिक 100 अब्ज डॉलर्स (सुमारे 7377 अब्ज रुपये) बचत होईल.

आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या नॅसकॉम या संस्थेच्या मते, या उद्योगात काम करणारे सुमारे 9 दशलक्ष लोक लो-स्किल आणि बीपीओमध्ये काम करतात. या 90 लाख लोकांपैकी 2022 पर्यंत सुमारे 30% किंवा 30 लाख लोकांच्या नोकर्‍या धोक्यात येऊ शकतात. या स्तरावरील रोबोटिक प्रक्रिया, ऑटोमेशनची वाढ हे त्यामागचे कारण आहे. ऑटोमेशनचा अवलंब करणार्‍या कंपन्यांचा असा दावा आहे ,की रोबोट्स 24 तास सॉफ्टवेअर म्हणून कार्य करू शकतात, ज्यामुळे त्यांची उत्पादकता वाढेल. यासह 1 रोबोट तब्बल 10 लोकांचे काम करू शकतो. (हेही वाचा: Indian Navy Bharti 2021: नौसेनेत नोकर भरती, SSC Officer पदासाठी करता येणार अर्ज)

टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल, टेक महिंद्रा आणि कॉग्निझंट या भारतीय आयटी मार्केटमधील सर्व आघाडीच्या कंपन्या ऑटोमेशनमुळे 2022 पर्यंत मोठ्या प्रमाणात लोकांना काढून टाकतील, असेही नॅसकॉमच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, ऑटोमेशनचा सर्वाधिक वाईट परिणाम अमेरिकेवर होईल जिथे 10 लाख लोकांच्या नोकऱ्या जातील.