10th and 12th Exams Update: राज्यातील Covid-19 परिस्थितीचा आढावा घेऊन 15 फेब्रुवारीनंतर 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत निर्णय
Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याची सूचना केल्यानंतर, काही दिवसांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, सरकारने 'वेट आणि वॉच’ हे धोरण अवलंबले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्याबाबत किंवा परीक्षा 15 फेब्रुवारीनंतर पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेईल. राज्यात 12 वीच्या परीक्षा 4 मार्चपासून तर 10 वीच्या परीक्षा 15 मार्चपासून सुरू होणार आहेत.

राज्यमंत्र्यांनी नुकतीच दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत बैठक घेतली. या परीक्षांबाबत अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल. सध्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला जात आहे. सरकार 15 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहे. त्यानंतर या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत MSBSHSE आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली.

त्या पुढे म्हणाल्या, ‘आम्हाला अकरावीचे प्रवेश ऑनलाइन होण्याची अपेक्षा आहे. पुढील शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू व्हावे, अशी आमची इच्छा आहे. शिक्षक संघटना, शिक्षण तज्ज्ञ आणि शाळेच्या मुख्याध्यापकांशी चर्चा करून आम्ही रोडमॅप ठरवू. सध्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा वेळेवर आणि ऑफलाइन होण्याची शक्यता आहे.’ (हेही वाचा: अभ्यासाच्या दडपणाखाली तरुणी दिल्लीहून घर सोडून महाराष्ट्रात पोहोचली, रिक्षाचालकाच्या समजूतदारपणामुळे तरुणी कुटुंबाकडे सुखरुप)

बच्चू कडू यांनी शुक्रवारी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षण अधिकारी आणि विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत ऑनलाइन बैठकीत या परीक्षा एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या जाव्यात, असे सुचविले होते. ते म्हणाले होते, गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत, ऑनलाइन शिकवण्या सुरु आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांची अभ्यास आणि लेखनाची सवय मोडली आहे. त्यांचा लेखनाचा सराव देखील नाही. त्यामुळे त्यांना मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांना बसणे कठीण होऊ शकते.