Haryana: हरियाणामध्ये दुष्यंत चौटालांचे BJP ला समर्थन; भाजपचा असेल मुख्यमंत्री, तर जेजेपीचा उपमुख्यमंत्री
Amit Shah, Manohar Lal Khattar, Dushyant Chautala (Photo Credits: IANS)

हरियाणा विधानसभा निवडणूक 2019 (Haryana Assembly Election 2019) च्या निकालानंतर, राज्यातील सरकार स्थापनेविषयी मीडियामध्ये सातत्याने बातम्या येत होत्या. कॉंग्रेसला (Congress), भाजपला (BJP) पूर्ण बहुमत न मिळाल्यामुळे, दुष्यंत चौटाला (Dushyant Chautala) यांच्या पक्षाची जेजेपीची (JJP) लॉटरी निघाली आहे. देशाची राजधानी दिल्लीत दुष्यंत चौटाला यांची, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांच्या समोर युतीची घोषणा करण्यात आली. यावेळी भाजपा खासदार अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, हरियाणा भाजपचे प्रमुख सुभाष बराला उपस्थित होते.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमित शहा म्हणाले की, हरियाणामध्ये भाजप-जेजेपी सरकार स्थापन करणार आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री भाजपचे असतील तर उपमुख्यमंत्री जननायक जनता पक्षाचे असतील. अहवालानुसार, हरियाणा सरकारमध्ये जेजेपीला दोन कॅबिनेट पदे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यात एक राज्यमंत्री आणि एक राज्यसभेची जागा आहे. याद्वारे, उपमुख्यमंत्रीपदी दुष्यंत असतील असा विश्वास आहे. हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला 41 जागा, कॉंग्रेसला 31 जागा मिळाल्या आहेत. तर दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाला, जेजेपीला 10 जागा मिळाल्या आहेत. राज्यात बहुमताचा आकडा 46 जागा आहे, त्यामुळे भाजपला जेजेपीशी युती करण्यावाचून पर्याय उरला नव्हता. (हेही वाचा: शिवसेना पक्षासोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस उत्सुक, बाळासाहेब थोरात यांच्याकडून खुली ऑफर)

यासोबतच जेजेपीने आपल्या जाहीरनाम्यात जी वाचणे नमूद केली होती, त्यालाही भाजपने मान्यता दिली आहे. जेजेपीने आपल्या जाहीरनाम्यात राज्यातील नोकर्‍यांमध्ये स्थानिक तरुणांना 75 टक्के आरक्षणाचे वचन दिले होते. तसेच ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन, कर्करोगग्रस्तांना मोफत इलाज, स्त्री सक्षमीकरण सारख्या मुद्दे नमूद केले होते, त्याला भाजपने सहमती दिली आहे.