H3N2 Virus: H3N2 मुळे केंद्र सरकारची चिंता वाढवली आहे. नीती आयोगाने H3N2 संदर्भात बैठकही घेतली आणि आता केंद्र सरकारकडून पत्र लिहून राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. देशभरात इन्फ्लूएंझा सारखे आजार आणि श्वसनाचे गंभीर आजार वाढत असल्याचा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. याबाबत नागरिकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. दरम्यान, पुद्दुचेरीमध्ये H3N2 इन्फ्लूएंझाच्या 79 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, सर्व प्रयोगशाळांमध्ये केलेल्या नमुन्यांच्या विश्लेषणामध्ये इन्फ्लूएंझा ए (एच3एन2) चे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येणे ही विशेष चिंतेची बाब आहे. ते म्हणाले की वृद्ध, लहान मुले आणि अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना विशेषतः धोका असतो. हे लोक HIN1, H3N2, Adenovirus इत्यादींबाबत अधिक संवेदनशील असतात. (हेही वाचा -H3N2 Virus Scare: H3N2 हाँगकाँग फ्लूमुळे भारतात पहिल्या मृत्यूची नोंद; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती)
राज्यांना लिहिलेल्या पत्रात गेल्या काही महिन्यांत कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे म्हटले आहे. परंतु काही राज्यांमध्ये कोविड चाचणीत सकारात्मकतेच्या दरात हळूहळू होणारी वाढ ही चिंताजनक बाब आहे. याबाबत सतर्क राहून तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचं सरकारने सांगितले आहे.
कोणाला जास्त धोका आहे?
सचिव राजेश भूषण पुढे म्हणाले की, वृद्ध, लठ्ठपणाने ग्रस्त असलेले आणि एकापेक्षा जास्त आजारांनी ग्रस्त लोक आणि गर्भवती महिलांनी H3N2 आणि एडेनोव्हायरस इत्यादींबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. समस्या वाढल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल.