Children Die at Delhi Shelter Home: दिल्लीतील मतिमंद मुलांसाठी बांधलेले आशा किरण होम (Asha Kiran Shelter) आता मुलांसाठी मृत्यूचे चेंबर बनत आहे. गेल्या 7 महिन्यात येथे 27 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर जुलैमध्ये 13 बालकांचा मृत्यू झाला. मुलांची काळजी आणि पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसणे हे मृत्यूचे कारण असल्याचे सांगण्यात आले. दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी आशा किरण मृत्यूप्रकरणी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जुलै महिन्यातच 20 दिवसांत 13 मुलांचा मृत्यू झाला. या वर्षी लागोपाठ मृत्यू झाले आहेत ज्यात जानेवारीमध्ये 3, फेब्रुवारीमध्ये 2, मार्चमध्ये 3, एप्रिलमध्ये 2, मेमध्ये 1, जूनमध्ये 3 आणि जुलैमध्ये 13 मृत्यू झाले आहेत. तर 2023 मध्ये जानेवारी ते जुलै दरम्यान एकूण 13 जणांचा मृत्यू झाला होता. एवढ्या गंभीर विषयावर आशा किरण प्रशासन बोलायला तयार नाहीये. एसडीएमने दिलेल्या अहवालात मुलांना पुरवल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.
रोहिणी सेक्टर 3 मध्ये असलेल्या आशा किरण होममध्ये मतिमंद मुले आणि प्रौढांना ठेवण्यात आले आहे. येथे त्यांची चांगली देखभाल केली जाते, असा दावा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत येथे होत असलेल्या गूढ मृत्यूंमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या निष्काळजीपणाबद्दल घटनास्थळी एक तथ्य शोध पथक पाठवले आहे. (हेही वाचा - Indore Shelter Home Tragedy: युगपुरुष धाम स्वयंसेवी संस्थेच्या बाल आश्रमातील मुलांना कॉलराची लागण, रुग्णालयात उपचार सुरु)
राष्ट्रीय महिला आयोग अधिकारी रेखा शर्मा यांनी सांगितलं की, वर्षानुवर्षे, दिल्ली सरकार चालवलेल्या आशा किरण निवारा गृहात लोक त्रस्त आहेत. अनेकांचा मृत्यू होतं आहे. मात्र, दिल्ली सरकार काहीही करत नाही. त्याची दखल घेऊन चौकशी करण्यासाठी माझी टीम पाठवत आहे. दरम्यान, दिल्लीचे मंत्री आतिशी यांनी मात्र मृत्यूच्या संख्येवर मतभेद व्यक्त केले आणि महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना (ACS) दंडाधिकारी चौकशी सुरू करण्यास आणि 48 तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. आतिशी यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे की निवारागृहात जानेवारी 2024 पासून 14 मृत्यू झाले आहेत. (हेही वाचा- मानवतेला काळीमा फासणारी घटना! झाशीतील पोस्ट मॉर्टम हाऊसमध्ये बाहेर ठेवण्यात आलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला; पहा धक्कादायक व्हिडिओ)
याआधीही निवारागृहात अशाच प्रकारचे मृत्यू झाले होते. त्यानंतर बराच गदारोळ झाला होता. अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यापूर्वी एक किंवा दोन किंवा जास्तीत जास्त 10 मृत्यू झाले होते. मात्र यावेळी महिनाभरात 13 जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अद्यात मृत मुलांच्या शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, मृत्यूचे कारण खराब पाणी असू शकते असेही एसडीएमचे मत आहे.