दिल्लीकरांना भरली हुडहुडी! तब्बल 119 वर्षांचा विक्रम मोडीत; 2.6 अंश सेल्सिअस नीचांक तापमानाची नोंद
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीने कहर केला आहे. दिल्लीमध्ये सोमवारी 2.6 अंश सेल्सिअस नीचांक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीकरांना प्रचंड हुडहुडी भरली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे दिल्लीत तब्बल 119 वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. आणखी काही दिवस दिल्लीकरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

अगोदरचं प्रदुषणामुळे त्रस्त असणाऱ्या दिल्लीकरांना आता गोठणाऱ्या थंडीने हैराण केले आहे. दिल्लीमध्ये थंडीबरोबर प्रचंड धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे दिल्लीतील रस्त्यावरील दृश्यमानता कमी झाली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. (हेही वाचा - थंडीमुळे उत्तर प्रदेशात 68 जणांचा मृत्यू; 8 राज्यात 'रेड अलर्ट' जारी)

थंडीमुळे दिल्लीकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्लीतील काही ठिकाणी पारा शून्य अंश सेल्सिअसवर गेला आहे. हवामान बदलामुळे विमान व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होत आहे. तसेच दाट धुक्यामुळे विमान उड्डाणाला फटका बसला असून अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, काश्मीर, मध्य प्रदेश, पंजाब या सर्व राज्यांमध्ये थंडीची लाट आहे.