Delhi Police: दिल्ली पोलिसांसंदर्भात आज एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी एका तस्करांकडून सुमारे 160 किलो गांजा (Ganja) जप्त केला आणि दुसर्या तस्करांना लाखो रुपयांमध्ये विकला. यावेळी पोलिसांनी नोंदीमध्ये केवळ 1 किलो गांजा जप्त केल्याचं दाखवलं आणि संबंधित गांजा तस्करांना सोडून दिलं. या प्रकरणी सध्या 4 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, 11 सप्टेंबर रोजी जहांगीरपुरी पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या एका हवालदाराने गांजा तस्कर अनिलला अटक केली होती. त्यानंतर अनिलच्या घरावर छापा टाकल्यानंतर सुमारे 160 किलो गांजा सापडला. मात्र, पोलिसांनी तस्करांना सोडून दिले आणि रेकॉर्डमध्ये केवळ एक किलो गांजा सापडल्याची नोंद केली. (हेही वाचा - धक्कादायक! बिहारमध्ये 'चेटकीण' समजून महिलेची गोळ्या घालून हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल)
प्राप्त माहितीनुसार, हवालदारने उर्वरित भांग पोलिस ठाण्याच्या स्टोअरमध्ये ठेवला होता. या हवालदाराने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने दुसर्या तस्करांना हा गांजा विकून लाखो रुपये वाटून घेतले. या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजताचं त्यांनी चार आरोपी पोलिसांना निलंबित केले. यात दोन उपनिरीक्षक आणि दोन हवालदारांचा समावेश आहे. या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी सध्या पोलीस ड्रग पेडलर अनिलचा शोध घेत आहेत.
बॉलिवूडमध्ये अमली पदार्थांचा वापर वाढला असून अनेक सेलिब्रिटी अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान, ड्रग्ज एंगलची चौकशी करताना आतापर्यंत अनेक नावे समोर आले आहेत. त्यामुळे एनसीबीकडून दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खानची चौकशी करण्यात आली आहे.