बलात्कार प्रकरण: 12 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांची प्रकृती खालावली
Delhi Commission for Women Swati Maliwal (PC-ANI)

देशात महिलांवर होणाऱ्या बलात्कार प्रकरणातील आरोपींना लवकरात-लवकर फाशी द्यावी, या मागणीसाठी मागील 12 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Delhi Commission for Women Swati Maliwal) यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना एलएनजेपी (LNJP Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारपासून स्वाती यांची प्रकृती अत्यंत खालावली होती.

गेल्या 12 दिवसांपासून उपोषणाला बसल्यामुळे त्यांचे 8 किलो वजन कमी झाले असून प्रचंड अशक्तपणा आला आहे. त्यामुळे त्यांना चालणं तसेच बोलणंही कठीण झालं आहे. एलएनजेपी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, स्वाती यांचे युरिक अॅसिड वाढले आहे. स्वाती यांनी बलात्कार प्रकरणातील आरोपींना 6 महिन्यांच्या आत फासावर लटकावले पाहिजे, अशी मागणी केली आहे. (हेही वाचा - निर्भयाच्या आरोपींना फाशी देण्याची संधी द्या; आंतरराष्ट्रीय शुटर वर्तिका सिंह यांची अमित शहा यांच्याकडे रक्तलिखित पत्रातून मागणी)

हैदराबादमध्ये डॉक्टर महिलेवर झालेला सामूहिक बलात्कार तसेच उन्नावमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर स्वाती उपोषणाला बसल्या आहेत. स्वाती यांनी 2018 मध्येही महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपोषण तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले होते. स्वाती यांची प्रकृती खालावल्याने निर्भयाच्या आईने उपोषण थांबवण्याचे आवाहन केले होते. मात्र, तरीदेखील स्वाती यांनी उपोषण चालूचं ठेवले. जोपर्यंत 'दिशा विधेयक' लागू होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे स्वाती यांनी सांगितले आहे.