Just Dial मध्ये झाला10 कोटींपेक्षा अधिक युजर्सचा डेटा लीक; मोबाइल नंबरसह ईमेल आयडी आणि पत्ते झाले सार्वजनिक
JustDial Users' Personal Data Leaked (Photo Credits: Twitter)

एखादी वेबसाईट, अॅप अथवा अगदी आधार कार्डसाठी आपण मोठ्या विश्वासाने आपली खासगी माहिती देतो. मात्र अनेकवेळा ही माहिती योग्य पद्धतीने हाताळली जात नाही. फेसबुक, आधार यांच्यासाठी दिली गेलेली खासगी माहिती सार्वजनिक होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, आता जस्ट डायल (Just Dial) चा डेटा हॅक झाला असून 10 कोटींपेक्षा अधिक युजर्सची माहिती सार्वजनिक झाली आहे. ग्राहकांच्या लीक झालेल्या माहितीमध्ये नावे, ईमेल आयडी, मोबाइल नंबर, लिंग, जन्मतारीख आणि पत्ते यांचा समावेश आहे.

स्वतंत्र सुरक्षा संशोधक राजशेखर राजहरिया यांनी आपल्या फेसबुकमध्ये या गोष्टीची माहिती दिली. जस्ट डायलच्या 8888888888 या नंबरवर कॉल केलेल्या 70 टक्के युजर्सची माहिती लीक झाली आहे. ही माहिती कंपनीच्या वेबसाईटच्या जुन्या व्हर्जनमधून लीक झाली आहे. 2015 पासून कंपनीने या व्हर्जनकडे लक्षच दिले नसल्याने ही घटना घडली. याआधी फिन्टेक स्टार्टअप अर्लीसॅलरी, ट्रॅव्हल फर्म इक्सिगो, फूडटेक कंपनी फ्रेशमेन्यू आणि झोमॅटो यांसारख्या कंपन्यांच्या बाबतीत अशा डेटा लीकच्या घटना घडल्या आहेत. (हेही वाचा: फेसबुक डेटा लीक सत्र सुरूच; कोट्यवधी युजर्सची माहिती अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक)

यात सर्वात चिंतेची बाब म्हणजे, कोणत्याही युजर्सने अॅप अथवा वेबसाईटचा उपयोग न करता फक्त एकदातरी कस्टमर केअरच्या नंबरवर कॉल केला असेल तरी त्याचा डेटा लीक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. राजशेखर यांनी याबाबत कंपनीशी संपर्क साधला होता, मात्र अजूनही कंपनीने यावर कोणतही पावले उचलली नाहीत.