Vande Bharat Express (PC- ANI)

Vande Bharat Express: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने देशाला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ट्रेन भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी (PM Modi) शुक्रवारी दक्षिण भारतातील पहिल्या आणि देशातील 5व्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पीएम मोदी बेंगळुरूमधील केएसआर रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि त्यांनी देशाला चेन्नई-म्हैसूर वंदे भारत ट्रेनची भेट दिली.

चेन्नई-म्हैसुरू वंदे भारत ट्रेन मार्ग -

देशातील पाचवी वंदे भारत चेन्नई-बेंगळुरू आणि म्हैसूर मार्गावर धावणार आहे. वंदे भारत या मार्गावर सुमारे 500 किमी अंतर कापणार आहे. ही ट्रेन बुधवार वगळता सर्व दिवस धावणार आहे. ट्रेन क्रमांक 20607 चेन्नई सेंट्रल स्टेशनवरून सकाळी 05:50 वाजता सुटेल. दुपारी 12.20 वाजता म्हैसूर जंक्शनला पोहोचेल. यादरम्यान ती कातपडी जंक्शन, केएसआर बंगळुरू येथे थांबेल. त्याचवेळी वंदे भारत म्हैसूर जंक्शन येथून दुपारी 1:5 वाजता निघेल. ही ट्रेन संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नई सेंट्रल स्थानकावर पोहोचेल. (हेही वाचा - Missing Link Project: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे 60 टक्के काम पुर्ण, मुख्यमंत्र्यांनी बांधकामाचा घेतला आढावा)

साडेसहा तासात पूर्ण होईल प्रवास -

चेन्नई सेंट्रल स्टेशन ते म्हैसूर जंक्शन स्टेशनचे अंतर सुमारे 500 किमी आहे. वंदे भारत हा प्रवास सुमारे साडेसहा तासात पूर्ण करेल. चेन्नई ते बंगळुरू हा प्रवास अवघ्या साडेचार तासात पूर्ण होणार आहे. रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, ही ट्रेन 160 किमी प्रतितास वेगाने धावू शकते.

किती असेल भाडे?

वंदे भारत एसी चेअर कारमध्ये चेन्नई-म्हैसूर प्रवासासाठी तुम्हाला 1200 रुपये मोजावे लागतील. त्याच वेळी, एक्झिक्युटिव्ह चेअर कार सीटचे भाडे 2295 रुपये असेल.

देशातील पाचवी वंदे भारत ट्रेन -

याआधी चार वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. देशातील पहिली वंदे भारत ट्रेन नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली. नवी दिल्ली ते कटरा मार्गावर दुसरी वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली. यानंतर गांधीनगर-मुंबई मार्गावर दुसरी वंदे भारत ट्रेन सुरू झाली. गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदींनी उना-नवी दिल्ली मार्गावर आणखी एका वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.