Coronavirus | Representational Image | (Photo Credits: IANS)

Coronavirus Outbreak: आज भारतात गेल्या 24 तासांत 508 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 13 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे भारतातील कोरोना बाधितांची संख्या 4789 झाली आहे. यातील 4312 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 353 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत देशात कोरोनामुळे 124 जणांचा बळी गेली आहे. यासंदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती दिली आहे.

देशात महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, तामिळनाडू, मध्ये प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आदी राज्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यातील अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील तबलिगी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दरम्यान, आज तामिळनाडू मध्ये 69 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे तामिळनाडू राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 690 वर पोहचली आहे. यातील 636 जणांनी दिल्लीतील तबलिगी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. (हेही वाचा - Coronavirus: मुंबईमध्ये आज 100 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर 5 जणांचा मृत्यू; मुंबई शहरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 590 वर पोहचली)

दरम्यान, महाराष्ट्रात आज 150 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 1018 वर पोहचली आहे. यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाने माहिती दिली आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची सर्वाधिक संख्या मुंबई शहरामध्ये आहे. मुंबईमध्ये आज 100 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच मुंबईत आज 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबई शहर तसेच मुंबई उपनगरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 590 वर पोहचली आहे.