Vidya Devi (Photo Credit: Twitter)

कृषी कायद्याविरोधात (Farm Act) गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. दरम्यान, शेतकरी आणि सरकारमध्ये अनेका बैठका पार पडल्या असून शेतकरी आपल्या मागण्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारचा कृषी कायदा देशातील शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक असल्याचे सांगत काँग्रेसकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला जात आहे. यातच हरियाणातील काँग्रेस नेत्या विद्या देवी यांनी शेतकरी आंदोलनावरून वादग्रस्त विधान केल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील आंदोलन चालू ठेवण्यासाठी पैसे वाटा किंवा दारू द्या, असे खळबळजनक वक्तव्य विद्या देवी यांनी केले आहे.

काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत बोलताना विद्या देवी म्हणाल्या की, काँग्रेस जेव्हापासून निवडणूक हारले आहे, तेव्हापासून पक्षाचे अस्तित्व संपले आहे. आता हे आंदोलन कसेतरी उभा राहिले असून आपल्याला प्रत्येक परिस्थितीत ते पुढे घेऊन जायचे आहे. शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांची मदत करा, मग ती पैशाच्या बाबतीत असो किंवा दारू. या शेतकऱ्यांसाठी दारूही दान करू शकता. जितके शक्य होईल तितके सहकार्य करून हे आंदोलन पुढे घेऊन जा, असेही त्या म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा- भोपाळमध्ये Premium Petrol Price ने शंभरी गाठल्याने तरूणाने बॅट, हेल्मेट उंचावत अनोख्या अंदाजात नोंदवला निषेध; फोटो व्हायरल

हर्षवर्धन यांचे ट्विट-

विद्या देवी यांच्या या वक्तव्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजप नेते डॉ. हर्षवर्धन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून ते म्हणाले की, काँग्रेस आणखी किती खालच्या स्थरावर जाणार? कॉंग्रेस नेत्या श्रीमती विद्या राणी शेतकरी आंदोलनकर्त्यांना दारू देण्याविषयी बोलत आहेत. महात्मा गांधींना आदर्श मानणार्‍या कॉंग्रेससाठी ती नैतिक अधोगतीची कळस आहे. या आंदोलनाला कुठून ऑक्सिजन मिळत आहे, हे आता कोणापासून लपलेले नाही, असेही हर्षवर्धन म्हणाले आहेत.