सध्या कॉंग्रेस पक्ष (Congress) चहूबाजूंनी संकटांचा सामना करत आहे. लोकसभा निवडणुकीमधील पराभव अजूनही पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. त्यात पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे राजीनामा सत्र सुरु आहे. यासोबतच देशातील इतर अनेक कॉंग्रेस नेत्यांनीही आपले राजीनामे सुपूर्त केले आहेत. त्यात भर म्हणून कॉंग्रेसवर आर्थिक संकटही कोसळले आहे. सध्या पक्षाची आर्थिक स्थिती इतकी डबघाईला आली आहे की, खर्चाची बचत करण्यासाठी पक्षाकडून विविध विभागांना दिलेल्या निधीत घट केली आहे, तसेच पक्षाच्या विविध बिभागांमधील कर्मचारी संख्या घटवून त्यांचे पगारही थकीत ठेवले आहेत.
‘इंडिया टुडे’न याबाबतचे वृत्त दिले आहे. कॉंग्रेसने सेवा दलाला महिन्याच्या खर्चासाठी दोन लाखांऐवजी दीड लाख देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिला काँग्रेस, नॅशनल स्टुडेंट युनियन ऑफ इंडिया आणि युवक काँग्रेसला त्यांचे सर्व खर्च कमी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या सोशल मिडिया विभागातील 55 पैकी 20 लोकांना काढून टाकण्यात आले आहे. (हेही वाचा: काँग्रेस पक्षात नेत्यांचे राजीनामा सत्र सुरु, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोडले सरचिटणीस पद)
सोशल मिडिया विभाग, काँग्रेस मुख्यालयातील कर्मचारी यांना लोकसभा निवडणुकीनंतर पगारच मिळालेला नाही. फक्त काँग्रेस संघटनेत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच वेळेवर पगार मिळत आहे. याधीही भाजपशी तुलना करता कॉंग्रेसकडे कमी पैसे असल्याचे राहुल गांधी यांनी बोलून दाखवले होते. मात्र इतक्या कमी कालावधीमध्ये पक्षाची अशी स्थिती होईल याचा कोणीच विचार केला नव्हता. त्यात गोवा आणि कर्नाटक मध्ये चालू असलेल्या वादानंतर पक्षाला कोण तारेल हे येणारा काळच सांगेल.