Mamata Banerjee | (Photo Credits: ANI)

CM Mamata Banerjee Apologizes: टीएमसी नेते आणि मंत्री अखिल गिरी (Akhil Giri) यांनी राष्ट्रपतींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी माफी मागितली आहे. आमच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आम्ही माफी मागतो. यावर पक्ष कारवाई करेल. अशा विधानाशी पक्षाचा काहीही संबंध नाही. कुणीतरी चूक केली आहे आणि आम्ही त्याला विरोध करत आहोत. त्याचे समर्थन करत नाही, पण दररोज विधाने करायची आणि खोटे बोलत राहण्याची जी भाषा वापरली जात आहे, ती अस्वीकार्य आहे, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी पुढे बोलताना म्हणाल्या की, बोलणे ही एक कला आहे. मी कधी कधी 'किंभूतकिमाकर' हा शब्द वापरते. हा शब्दकोषातील शब्द आहे. मी शब्दकोषाबाहेरचा कोणताही शब्द वापरला नाही. जर मी कधी वाईट शब्द उच्चारला तर मी तो लगेच परत घेते आणि अर्थातच आम्हाला तो अधिकार आहे. (हेही वाचा - Supreme Court on Forced Religious Conversion: सक्तीच्या धर्मांतराचा मुद्दा गंभीर, धर्मांतरामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि धर्म स्वातंत्र्यावर परिणाम होतो; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण)

काय म्हणाले होते अखिल गिरी?

पश्चिम बंगालचे सुधारणा गृहमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (TMC) नेते अखिल गिरी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली. नंदीग्राममधील एका गावातल्या सभेत ते म्हणाले की, मी छान दिसत नाही. आम्ही कोणाला त्यांच्या दिसण्यावरून ठरवत नाही. आपण राष्ट्रपती पदाचा आदर करतो, पण आपल्या राष्ट्रपती कशा दिसतात?

या विधानावर चौफेर टीका झाल्यानंतर अखिल गिरी यांनी शनिवारी माफी मागितली होती. राष्ट्रपतींचा अनादर करण्याचा माझा हेतू नव्हता, असं त्या म्हणाल्या. माझ्यावर हल्ला करणाऱ्या भाजप नेत्यांच्या वक्तव्यांना मी फक्त उत्तर देत होतो. माझ्या दिसण्यामुळे मी दररोज शाब्दिक हल्ल्याचा बळी होतो. मी राष्ट्रपतींचा अनादर केला असे कोणाला वाटत असेल तर मी या विधानाबद्दल माफी मागतो. देशाच्या राष्ट्रपतींबद्दल मला नितांत आदर आहे.

दरम्यान, अखिल गिरी यांच्या वक्तव्यानंतर भाजपने तृणमूल काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता आणि म्हटले होते की, गिरी यांचे वक्तव्य टीएमसीची आदिवासी विरोधी मानसिकता दर्शवते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले की, अखिल गिरी यांनी देशाच्या राष्ट्रपतींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यांना तातडीने आमदार म्हणून अपात्र ठरवून अटक करण्यात यावी.

बंगाल भाजपने कोलकात्यासह राज्याच्या विविध भागांत रॅली काढून गिरी यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी आणि त्यांच्या अटकेची मागणी केली होती. भाजपशिवाय इतर अनेक पक्षांनीही या विधानावर टीका केली. त्याचवेळी, टीएमसीने असे म्हटले होते की ते अशा टिप्पणीचे समर्थन करत नाही. परंतु, नेत्यांनी वैयक्तिकरित्या केलेल्या टिप्पण्यांची जबाबदारी घेणार नाही.