Jammu Kashmir Update: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक जवान आणि कनिष्ठ अधिकारी जखमी
File image of security forces in Jammu and Kashmir (Photo Credits: IANS)

जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पूंछमध्ये (Poonch) सुरक्षा दलांची पुन्हा एकदा दहशतवाद्यांशी (Terrorists) चकमक झाली आहे. या दरम्यान एक कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी आणि एक जवान जखमी झाले. संरक्षण विभागाने सांगितले की, पुंछ जिल्ह्यातील मेंढरच्या नर खास जंगलात दहशतवादविरोधी कारवाई दरम्यान एक जेसीओ आणि एक जवान गंभीर जखमी झाला आहे. दहशतवाद्यां विरोधातील कारवाई अजूनही सुरू आहे. सोमवारीही पुंछमध्ये दहशतवाद्यांशी चकमक झाली. जेसीओसह पाच जवान शहीद झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, सीमावर्ती जिल्ह्यातील पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट भागातील डेरा की गली (DKG) जवळच्या गावात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सैनिक ठार झाले.

अधिकाऱ्यांच्या मते, नियंत्रण रेषा ओलांडलेल्या दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर लष्कराचे जवान तेथे पोहोचले आणि शोधमोहीम सुरू केली. या दरम्यान दहशतवाद्यांकडून लष्करावर गोळीबार सुरू करण्यात आला. या दहशतवादविरोधी कारवाई दरम्यान एक ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (JCO) आणि लष्कराचा एक जवान चकमकीत जखमी झाले.

पुंछ जिल्ह्यातील सुरक्षा दलांवर हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी दोन ते तीन महिने या परिसरात होते, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. गेल्या काही दिवसांपासून जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. सुरक्षा दलाने अवघ्या दोन आठवड्यांत 10 दहशतवाद्यांना ठार केले आहे. बुधवारीच सुरक्षा दलाने पुलवामाच्या त्राल भागात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर शाम सोफी याला ठार केले. हेही वाचा Rahul Gandhi Criticizes On BJP: इंधन दरवाढप्रश्नी राहुल गांधीची भाजपवर घणाघाती टीका, ''लोभी कुशासन'' म्हणत केलं 'असं' ट्विट

अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यात लष्कराने एक दहशतवादी ठार केला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी जिल्ह्यातील वेरीनाग भागातील खगुंड येथे घेराव आणि शोधमोहीम सुरू केली होती. काश्मीरमध्ये अल्पसंख्यांक नागरिकांच्या लक्ष्यित हत्यांनंतर सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाया तीव्र केल्यानंतर गेल्या सहा दिवसांत सहा चकमकींमध्ये नऊ दहशतवादी ठार झाले आहेत.