CJI रंजन गोगोई (Photo Credit: PTI)

भारतात चाललेल्या #Metoo मोहिमेमुळे स्त्रियांवर झालेल्या अनेक अत्याचारांची उदाहरणे समोर आली. चित्रपटसृष्टीमधील अनेक नामवंत मंडळींसोबत इतर क्षेत्रातील लोकप्रिय मंडळींचेही खरे चेहरे जनतेने पाहिले. आता परत एकदा स्वतःवर झालेल्या अत्याचाराबद्दल एका महिलेने वाचा फोडली आहे, आणि यामध्ये ज्या व्यक्तीवर हे आरोप झाले आहेत ते आहेत भारतीय सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश रंजन गोगोई (CJI Ranjan Gogoi). ही महिला रंजन गोगोई यांची सहकारी होती. 2018 साली ही घटना घडल्याचे या महिलेने सांगितले आहे. मात्र रंजन गोगोई यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

या महिलेने केलेल्या आरोपानुसार, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी 10 आणि 11 ऑक्टोबर, 2018 रोजी त्यांच्या राहत्या घरातल्या ऑफिसमध्ये लैंगिक शोषण केले. तिने आपली ही कैफियत 19 एप्रिल रोजी 22 न्यायाधीशांसमोर प्रतिज्ञापत्र लिहून मांडली आहे. 'रंजन गोगोई यांनी मला जवळ घेऊन, माझ्या शरीराला नकोसे स्पर्श केले. मला घट्ट पकडून गैरवर्तन केले. मी स्वत:ची सुटका करुन बाहेर जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी मला सोडले नाही', असे तिने आपल्या आरोपांमध्ये म्हटले आहे.

(हेही वाचा: तब्बल तीन कोटी खटले प्रलंबित : सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा बडगा; न्यायाधीशांच्या सुट्ट्या रद्द !)

मात्र रंजन गोगोई यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या सचिवांनी प्रसिद्ध केलेल्या एका ई-मेलमध्ये 'हे आरोप खोटे असून, न्याय संस्थेला बदनाम करण्याचा हा डाव आहे. न्यायपालिकेच्या  स्वतंत्रतेला फार मोठा खतरा आहे,’ असे म्हटले आहे. याबात खंडपीठाने अजून कोणताही निर्णय दिला नाही, तसेच न्यायपालिकेच्या स्वतंत्रतेची रक्षा करण्यासाठी माध्यमांनी संयम बाळगावा असे आवाहन करण्यात आले आहे. पुढच्या आठवड्यात बऱ्याच महत्त्वपूर्ण प्रकरणांची सुनावणी होणार आहे, त्यामुळे जाणूनबुझून असे आरोप लावले गेले असल्याचे रंजन गोगोई यांचे म्हणणे आहे.