Nitin Gadkari (PC -ANI)

Citizenship Amendment Act: सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे मुस्लिमांवर कोणताही अन्याय होणार नाही. नवा कायदा अल्पसंख्यांक विरोधी नाही. मुस्लिम नागरिकांना शरणार्थी म्हणून आश्रय देण्यासाठी जगात अनेक देश आहेत. मात्र, हिंदू, बौद्ध, इसाई, पारशी लोकांसाठी कोणताही देश नाही. हिंदू धर्म सर्व धर्मांचा सन्मान करण्यास शिकवतो. भारतीय मुस्लिम लोक दुसऱ्या देशात गेल्यानंतर तेथे त्यांना हिंदू म्हणूनचं ओळखलं जातं. 'मग हिंदू असणं हे पाप आहे का?', असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी उपस्थित केला आहे. नागपूरमध्ये नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या भव्य मोर्चाला संबोधित करताना गडकरी बोलत होते.

नागरिकत्व कायदा हा भारतीय मुस्लिमांच्या विरोधात नाही. काँग्रेस पक्षाकडून या काद्यासंदर्भात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 'हिंदू' ही जीवन जगण्याची पद्धती आहे. त्यामुळे यात मुस्लिम आणि हिंदू असा भेदभाव नाही. काँग्रेसने मुस्लिमांना केवळ व्होट मशीन मानलं. काँग्रेसने मुस्लिमांसाठी काय केलं? असा सवाल करत गडकरींनी काँग्रेसवर निशाणा साधला. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधीं यांनी शरणार्थींना संकटकाळी आधार देण्याचे आश्वासन दिले होते. आता आमचे सरकार तेच काम करत आहे. यात आमच्या सरकारचं काय चुकलं? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. (हेही वाचा - CAA Protest: नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलनात हिंसाचार केल्याप्रकरणी यूपी मधील मृतांचा आकडा 15 वर पोहचला)

 

भारतात घुसखोरी करणाऱ्यांना देशात राहू दिले जाणार नाही. परंतु, जे लोक अत्याचारग्रस्त आहेत, अशाना भारत आधार देण्याचा प्रयत्न करत आहे. आमचे सरकार संविधानानुसारच काम करत आहे. आमच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श आहे. त्यांनी त्यांच्या राज्यात कधीही मुस्लिमांवर अत्याचार केला नाही. त्यामुळे आमच्या सरकारकडून मुस्लिमांवर कधीही अत्याचार होणार नाही, असा विश्वासही गडकरींनी यावेळी व्यक्त केला.