New Guidelines: केंद्र सरकारकडून नवीन गाईडलाईन्स जारी; शाळा, महाविद्यालये व सिनेमागृह सुरु, वाचा सविस्तर
Cinema Hall, School, Mumbai Local (PC - pixabay)

New Guidelines: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च 2020 मध्ये संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर देशभरातील शाळा, महाविद्यालये, सिनेमा हॉल, पब, रेस्टॉरंट्स, मुंबई लोकल, रेल्वे गाड्या आणि सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. याचा सर्वसामान्य जनतेवर मोठा परिणाम झाला. तसेच स्थलांतरित कामगारांनी पायी आपली मायभूमी गाठली. मार्च महिन्यानंतर भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव चांगलाचं वाढला. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे सरकारने कोरोना संक्रमण स्थिती लक्षात घेता वेळोवेळी लॉकडाऊनसंदर्भातील मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यात अनेक सुट देण्यात आल्या आहेत.

भारतात कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात शाळा, महाविद्यालये व सिनेमागृह सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. यात विविध सेवा सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. या मार्गदर्शक सुचनांनुसार, खालील सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. (वाचा - Mumbai Local Train Update: मुंबई लोकलने आजपासून सर्वसामान्यांना प्रवास करता येणार, दादर स्थानकात प्रवाशांची दिसली गर्दी)

सिनेमागृह 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी -

केंद्र सरकारने सिनेमा आणि मल्टिप्लेक्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार, 1 फेब्रुवारीपासून देशभरात 100 टक्के क्षमतेने सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

आजपासून सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू -

गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सर्वसामान्य जनतेसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली होती. आतापर्यंत केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू होती. मात्र, आज म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून सर्वसामन्य जनतेसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु, यासाठी सरकारने विशिष्ट वेळ ठरवून दिली आहे.

1 ली ते 10 वी पासूनचे सर्व वर्ग सुरू -

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सरकारने देशातील सर्व शाळा बंद केल्या होत्या. मात्र, आता सरकारने काही राज्यांमध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे सर्व वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी सरकारने दहावी ते बारावीची शाळा सुरु केल्या होत्या. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, हरियाणा, गुजरात, पंजाबमध्ये आजपासून 1 ली ते 10 वी पासूनचे सर्व वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूमुळे सर्वसामान्य जनतेला एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागत होती. मात्र, आजपासून या प्रवाशांना दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी परवानगीची आवश्यकता लागणार नाही. केंद्र सरकारच्या या मार्गदर्शक सुचनांमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.