Tihar Jail: दिल्लीच्या तिहार तुरुंगात एका कैद्यावर चाकूने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हत्येतील अंडरट्रायल कैदी हितेश याला जखमी अवस्थेत दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी सकाळी 11.15 च्या सुमारास कारागृहात गोगी टोळीचा सदस्य हितेश आणि टिल्लू ताजपुरिया टोळीतील इतर दोन सदस्यांमध्ये कथित भांडण झाले. त्यादरम्यान, तुरुंगात दगड फोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धारदार शस्त्राने किंवा अन्य शस्त्राने हितेशवर हल्ला करण्यात आला.
पोलिस उपायुक्त (पश्चिम) म्हणाले की, 'बुधवारी हरिनगर पोलिस स्टेशनला दीनदयाल उपाध्याय हॉस्पिटलमधून माहिती मिळाली होती की तिहार तुरुंगातून एका जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे. या माहितीच्या आधारे, स्थानिक पोलिस हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि प्रकरणाची माहिती घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेशवर हल्ला करणाऱ्यांची नावे गौरव लोहार आणि गुरिंदर अशी आहेत. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही, त्यांचा तपास सुरू आहे. हितेशला दुखापत झाली असून त्याला दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.'
अधिकाऱ्याने सांगितले की, हितेश 2019 पासून तुरुंगात आहे. तर गौरव आणि गुरिंदर यांच्यावर खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खटला सुरू आहे. पोलिस उपायुक्त (डीसीपी) पुढे म्हणाले, "गुन्हा लक्षात घेता, भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे." गेल्या वर्षी मे महिन्यात याच तुरुंगात गँगस्टर ताजपुरियाची प्रतिस्पर्धी टोळीच्या सदस्यांनी भोसकून हत्या केली होती.