BJP Manifesto: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) आता जवळ आली आहे. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. सर्व राजकीय पक्ष त्याच्या तयारीत व्यस्त आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच पक्षांचे प्रमुख नेते ठिकठिकाणी जाहीर सभा घेत आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने सभा घेत आहेत. निवडणुकीसंदर्भात सर्वच पक्षांनी आपले जाहीरनामेही प्रसिद्ध केले आहेत. मात्र भाजपचा जाहीरनामा अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्ष 14 एप्रिलला आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. भाजप मुख्यालय विस्तार केंद्रात सकाळी 9 वाजता हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही उपस्थिती असण्याची शक्यता आहे. व्हिजन डॉक्युमेंट जारी करताना पीएम मोदींसोबत पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, अमित शाह यांच्यासह पक्षाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा -Chaitra Navratri 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चैत्र नवरात्रीच्या 5 व्या दिवशी देशवाशीयांसाठी स्कंदमातेला केली खास प्रार्थना)
भारतीय जनता पक्षाने काही काळापूर्वी निवडणूक जाहीरनामा समिती स्थापन केली होती. या समितीत एकूण 27 जणांचा समावेश आहे. राजनाथ सिंह हे भाजपच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष आहेत. निर्मला सीतारामन या समितीच्या निमंत्रक असून पीयूष गोयल सहसंयोजक आहेत. याशिवाय इतर 24 जणांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
दरम्यान, 14 एप्रिल हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी खूप खास दिवस आहे. सध्या नवरात्रीचे पवित्र दिवस सुरू आहेत, त्यासोबतच 14 एप्रिलला आंबेडकर जयंती 2024 आहे. सर्वच पक्षांनी जाहीरनाम्यात मोठमोठी आश्वासने दिली आहेत. अशा स्थितीत भाजप काय स्वप्न दाखवते, हे जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतरच कळेल. भाजपच्या जाहीरनाम्यात गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांसाठी अनेक घोषणा केल्या जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.