भाग्यशाली खुर्ची (संग्रहित-संपादित प्रतिमा)

पाच वर्षापेक्षा जास्त काळापासून एका काचेच्या बॉक्समध्ये ठेवलेली एक 'लाकडाची खुर्ची' आता परत एकदा चर्चेत आली आहे. या खुर्चीला भाजप (BJP) ची लकी खुर्ची समजले जाते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींनी 19 ऑक्टोबर 2013 रोजी कानपूरमध्ये विजय शंखनाद सभा घेतली होती. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून ही त्यांची पहिलीच सभा होती. या सभेत मोदी ज्या खुर्चीवर बसले होते, ती खुर्ची कानपूर भाजपसाठी एकदम 'खास' आहे. कारण यामुळेच नरेंद्र मोदी यांना न भूतो न भविष्यती असे यश प्राप्त झाले. तेव्हापासून ही खुर्ची जिल्हा कार्यालयात जपून ठेवली आहे. आता परत एकदा नरेंद्र मोदी यांना या खुर्चीवर बसवण्याची तयारी सुरु झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 8 मार्चला कानपूर रॅली (Kanpur Rally) आहे, त्यासाठी या खुर्चीची रंगरंगोटी करून तिला तयार केले जात आहे. कारण पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनी या खुर्चीवर बसावे आणि विजय प्राप्त करावा अशी भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांची इच्छा आहे. 19 ऑक्टोबर 2013 रोजी नरेंद्र मोदी या खुर्चीवर पहिल्यांदा बसले व त्यांना कानपूरमध्ये विजय प्राप्त झाला. पुढे 2014 मध्ये पुन्हा एकदा ते या खुर्चीवर बसले आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान झाले. (हेही वाचा: ‘नरेंद्र मोदींनी भारताचा 5 वर्षांचा वेळ वाया घालवला’; धुळ्याच्या सभेत राहुल गांधी यांनी सोडले ‘भाजप’वर टीकास्त्र)

त्यानंतर डिसेंबर 2016 मध्ये उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदी या खुर्चीवर बसले होते, आणि 2017 मध्ये यूपीमध्ये भाजपचे सरकार आले. आता पुन्हा एकदा ही भाग्यशाली खुर्ची नरेंद्र मोदींसाठी तयार होत आहे, त्यामुळे आता मोदी या खुर्चीवर बसणार का आणि त्याद्वारे देशात पुन्हा भाजपला 'अच्छे दिन' येणार का, हे येणाऱ्या निवडणुकीनंतरच कळू शकेल.