'नरेंद्र मोदींनी भारताचा 5 वर्षांचा वेळ वाया घालवला'; धुळ्याच्या सभेत राहुल गांधी यांनी सोडले 'भाजप'वर टीकास्त्र
राहुल गांधी धुळे येथील सभेत बोलताना (Photo Credit : Youtube)

कॉंग्रेस (Congress) ने आपल्या प्रचाराचा नारळ महाराष्ट्रातील धुळे (Dhule) येथे आज फोडला. एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर कॉंग्रेसची पहिली जाहीर सभा पार पडली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan), कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi), काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी खा. मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात, भाजपने भारताचा पाच वर्षांचा वेळ वाया घालवला अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

राहुल गांधी म्हणाले, ‘नरेंद्र मोदी यांना नेहमी प्रकाशझोतात राहायला आवडते. इतका मोठा पुलवामा हल्ला घडला मात्र त्यावेळी मोदी आपल्या पब्लिक रिलेशनसोबत व्यस्थ होते. पंतप्रधांनी आजपर्यंत जी वचने दिली त्यातली कोणतीच पूर्ण केली गेली नाहीत. मात्र कॉंग्रेसने आपल्या भाषणावेळी ज्या घोषणा केल्या त्या पूर्ण केल्या. यावेळी राफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी भाष्य केले. साधे कादगाचे विमान न बनवू शकणाऱ्या कंपनीला राफेल विमानाचे कंत्राट देण्यात आले, आणि यानंतर पंतप्रधानांच्या देखरेखीखालीच 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात गेले.' (हेही वाचा: राफेल डील: मोदी सरकारला अडचणीत आणणारे राहुल गांधी यांचे ५ प्रश्न)

पुढे ते म्हणाले, सर्वात जास्त भ्रष्टाचार जमिनीत होतो. त्यामुळे कॉंग्रेसने जेव्हा जमीन अधिग्रहण मुद्दा मांडला, त्यावेळी 3 वेळा लोकसभेत हे बील रद्द करण्यात आले. नोटबंदीच्या काळात सामान्य जनतेला त्रास झाला. लोक तासन तास रांगेत उभे होते, मात्र अनिल अंबानी, मेहुल चोक्सी अशा लोकांना रांगेत का उभे राहावे लागले नाही? मोदी दोन हिंदोस्तान बनवत आहेत, एक गरीबांचा तर दुसरा अनिल अंबानी आणि उद्योजकांचा. मात्र आम्हाला एक हिंदोस्तान हवा आहे. जिथे बीजेपी जाते तिथे लोकांमध्ये द्वेष निर्माण करते, तर कॉंग्रेस सर्वांना एकत्र घेऊन काम करते.

देशातील सर्वात मोठी समस्या ही रोजगार आहे. 5 वर्षे नरेंद्र मोदी यांनी भारताचा वेळ वाया घालवला आहे, करण त्यांनी वर्षात फक्त 1 लाख युवकांना रोजगार दिला आहे. त्यामुळे आता युवकांना रोजगार देण्याचे काम फक्त कॉंग्रेस पक्षच करू शकते.’ असे राहुल गांधी म्हणाले.