Citizenship Amendment Act: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी भाजप 250 ठिकाणी पत्रकार परिषदा घेणार
Bhupender Yadav (PC _ANI)

Citizenship Amendment Act: नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. या कायद्याविरोधात देशभरात आंदोलन तसेच हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या कायद्याविषयी जनतेच्या मनामध्ये प्रचंड गैरसमज पसरला आहे. हा गैरसमज दूर करून या कायद्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी भाजप 250 ठिकाणी पत्रकार परिषदा घेणार आहे. या सभांच्या माध्यमातून भाजप 3 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) यांनी दिली आहे.

यावेळी भूपेंद्र यादव यांनी सांगितलं की, 'नागरिकत्व कायद्याबाबत पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी भाजपा प्रत्येक जिल्ह्यात एक सभा घेणार आहे. तसेच 250 ठिकाणी पत्रकार परिषदा घेणार आहे. ही मोहीम पुढील 10 दिवसांत राबवली जाईल. या मोहीमेच्या माध्यमातून आम्ही जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहोत,' असंही यादव यांनी सांगितलं. (हेही वाचा - CAA Protest: नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशात संतापाची लाट, यूपी आणि दिल्लीत हिंसाचारामुळे 10 जणांचा मृत्यू)

देशात सध्या नागरिकत्व कायद्याबाबत विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हा गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे. या कायद्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक छळाचे बळी ठरलेल्या अनेक लोकांना नवीन मार्ग मिळणार आहे, असं भूपेंद्र यादव यांनी यावेळी सांगितलं.

नागरिकत्व कायद्याविरोधात उत्तर प्रदेशमध्ये 10 डिसेंबरपासून सुधारीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात काही ठिकाणी झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच हिंसक आंदोलन प्रकरणी 705 जणांना अटक करण्यात आली आहे.