Representative Image (Photo Credit: Wikimedia Commons)

Bihar Poisonous Liquor Case: बिहारमधील सिवान जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने २० जणांचा मृत्यू झाला आहे. सिवान सदर रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन म्हणाले की, विषारी दारू पिऊन आतापर्यंत 20 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय विषारी दारू प्राशन केलेले लोक अजूनही उपचारासाठी रुग्णालयात पोहोचत आहेत. छपराचे एसपी म्हणाले की, छपरामध्येही या घटनेमुळे 4  जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. सिवानचे जिल्हा दंडाधिकारी मुकुल कुमार गुप्ता यांनी बुधवारी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी कौडिया वैसी टोला गावात उलट्या, डोकेदुखी आणि पोटदुखी यासारखी लक्षणे असलेल्या लोकांना भगवानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

जेव्हा त्यांची प्रकृती अधिकच बिघडली तेव्हा त्यांना सिवानच्या सदर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथून काहींना चांगल्या उपचारांसाठी पाटणा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (पीएमसीएच) पाठवण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या संख्येपेक्षा मृतांचा आकडा जास्त असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. पीडितांनी मंगळवारी संध्याकाळी विषारी दारू प्राशन केल्याचे आणि रात्री नऊच्या सुमारास अनेक जण आजारी पडल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

एकीकडे हे सर्व मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाल्याचा दावा पीडित कुटुंबीय करत आहेत. दरम्यान, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजेल, असे जिल्हा दंडाधिकारी गुप्ता यांनी बुधवारी सांगितले. छपरा (मुख्यालय) एएसपी राकेश कुमार यांनी बुधवारी सांगितले होते की, आम्हाला मंगळवारी दारू पिणाऱ्या तीन जणांची माहिती मिळाली आहे. त्यांना सदर हॉस्पिटल छपरा येथे दाखल केले असता उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला.

आम्ही घटनेचा तपास करत आहोत. सिवान आणि सारणमध्ये घडलेल्या दोन्ही घटनांची सध्या चौकशी सुरू आहे. अधिकारी मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेला विषारी दारू थेट जबाबदार आहे की नाही हे स्पष्ट करण्यासाठी वैद्यकीय तपासणी आणि पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा आहे.