
पुलवामा हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव वाढत गेला. दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यानंतर आज पहाटे भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला करून जवळजवळ 300 दहशतवाद्यांचा खातमा केला. त्यानंतर अजूनही सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील अंतर आणि संघर्ष वाढतच आहे. अशात आता केंद्र सरकारने भारतीय लष्कराला तातडीने 2700 कोटींच्या शस्त्र खरेदीला मंजूरी दिली आहे.
आज संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत डीएसीने संरक्षण सामग्री खरेदी करण्याच्या निर्णयाला तातडीने मान्यता दिली आहे. आता भारतीय शस्त्रास्त्रांमध्ये अद्ययावत शास्त्रांची भर पडणार आहे. यामध्ये सध्याच्या ताफ्यात तीन प्रशिक्षणार्थी जहाजांची भर पडणार आहे. ही जहाजे नौदलाच्या अधिकाऱयांना सागरी सुरक्षाविषयक प्रशिक्षण देण्यासाठी वापरात आणली जाणार आहेत. तसेच यामध्ये 2 पानबुड्यांचाही समावेश करण्यात येणार आहे. (हेही वाचा: मुंबई, पंजाब, गुजरात सीमेवर भारतीय वायुसेनेकडून हाय अलर्ट जाहीर)
पुलवामा येथे भारतीय लष्करावर झालेल्या हल्ल्यात 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले होते. त्यानंतर आज पहाटे भारतीय वायुसेनेने 12 विमानांच्या ताफ्यासह पाकिस्तान हद्दीत प्रवेश करून दहशतवादी संघटनांचे तळ उध्वस्त केले. या गोष्टीमुळे चिडलेल्या पाकिस्तानकडून चकमकी सुरु झाल्या आहेत. सध्याच्या या तणावग्रस्त पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा शस्त्र खरेदीचा निर्णय घेतला आहे.