Free Electricity in Punjab: पंजाबमध्ये आजचा दिवस खास आहे. आज म्हणजेच शनिवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) राज्यातील जनतेसाठी 300 युनिट मोफत वीज (Free Electricity) देण्याची घोषणा करणार आहेत. 1 जुलैपासून सर्वसामान्यांना 300 युनिट मोफत वीज मिळण्यास सुरुवात होणार आहे. पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारला एक महिना पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री भगवंत मान मोफत वीज देण्याची घोषणा करणार आहेत.
निवडणूक प्रचारादरम्यान दिल्लीच्या धर्तीवर आम आदमी पक्षाने पंजाबमधील जनतेला मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. आता आप सरकार आपले आश्वासन पूर्ण करण्यात व्यस्त आहे. मोफत वीज देण्याच्या योजनेबाबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची दिल्लीत भेट घेतली आहे. (हेही वाचा - Hanuman Janmotsav 2022: पंतप्रधान मोदी आज गुजरातमधील मोरबी येथे करणार हनुमानाच्या 108 फूट उंच मूर्तीचे अनावरण)
अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात एक बैठक घेतली आणि मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी, ऊर्जा सचिव दिलीप कुमार आणि पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (PSPCL) चे CMD यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 29 जून 2021 रोजी अरविंद केजरीवाल यांनी 300 युनिट मोफत वीज तसेच जुन्या घरांच्या बिलावरील प्रलंबित रक्कम माफ करण्याची घोषणा केली होती. राज्य आधीच कृषी क्षेत्राला मोफत वीज आणि सर्व अनुसूचित जाती, मागास जाती आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 200 युनिट मोफत वीज पुरवते.
Government of Punjab announces 300 units of free electricity for households from July 1st, 2022: Information and Public Relations Department, Punjab
— ANI (@ANI) April 16, 2022
पंजाबमध्ये विजेची मागणी वाढली असतानाच, त्याचवेळी राज्यालाही कोळशाच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. कोळशाच्या टंचाईमुळे राज्यातील वीजनिर्मितीचे चार युनिट आधीच बंद पडले आहेत. तर साबो पॉवर लिमिटेडचे एक युनिट तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे. अशा परिस्थितीत जनतेला मोफत वीज दिल्यास सरकारवर 5 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.