![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/05/2-330826112-380x214.jpg)
Weather Alert In India: गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात सुरू असलेले वादळ (Storm) पुढील चार दिवस कायम राहणार आहे. या वादळाचा देशाच्या विविध भागांवर परिणाम होणार असून अनेक भागात तापमान वाढणार आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय पात्रा (Director General Mrutyunjay Patra) यांनी अमर उजाला डॉट कॉमला सांगितले की, आर्द्रता आणि सतत वाढत असलेले तापमान यामुळे देशात वादळाची परिस्थिती निर्माण होत आहे. सध्याच्या हवामानाच्या परिस्थितीमुळे, गडगडाटी वादळे कायम राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, सोमवारी मुंबईत आलेल्या भीषण वादळाने 14 जणांचा बळी घेतला. तसेच यात अनेकजण जखमी झाले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आर्द्रता आणि तापमानामुळे धुळीच्या वादळांची निर्मिती -
या वादळामुळे आजही देशाच्या विविध भागांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस देशाच्या बहुतांश सागरी भागात अशी वादळे येणार असल्याचे मृत्युंजय पात्रा यांनी सांगितले. सतत वाढणारी आर्द्रता आणि तापमान यामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे. ज्या पद्धतीने वादळ मुंबईला धडकले. त्यामुळे अजूनही काही भागात वादळाची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. पुढील परिस्थिती पाहता हवामान खात्याने संबंधित राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (हेही वाचा -Weather Forecast: 'या' राज्यात उष्णतेची लाट उसळणार, भारतीय हवामान विभागाने दिले अपडेट, जाणून घ्या)
मध्य प्रदेश, ओडिसा, बिहारला वादळाचा तडाखा -
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा चढत राहील, त्यामुळे अशा चक्री वादळांची शक्यता आहे. याशिवाय मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगडसह अनेक भागांत अजूनही ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वाऱ्याचा वेग अपेक्षित आहे. मंगळवार आणि बुधवारी मध्य प्रदेशात जोरदार वादळ येऊ शकते. त्यामुळे मध्य प्रदेशातील संबंधित विभागांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. मध्य प्रदेश व्यतिरिक्त बिहार आणि ओरिसामध्येही वादळ येण्याची शक्यता आहे. या वादळाचा वेळ प्रचंड असणार आहे. त्यामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी टाळण्यासाठी संबंधित राज्यांना आधीच ॲडव्हायझरी जारी करून सतर्क करण्यात आले आहे.
वादळासोबतच या भागात पावसाचाही अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, केवळ या भागातच नाही तर उत्तर भारत आणि बंगालच्या अनेक भागात पाऊस पडेल. याशिवाय ईशान्येकडील हिमालयीन रांगेत तसेच अंदमानमध्ये पाऊस आणि वादळाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मंगळवार ते शुक्रवारपर्यंत उत्तर भारतातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशसह उत्तराखंडच्या काही भागांचा समावेश आहे. (हेही वाचा- मुंबईत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज)
तथापी, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत राजस्थान सर्वात उष्ण राज्य असणार आहे. त्यामुळे राजस्थान आणि गुजरातमध्येही धुळीचे वादळ येऊ शकते. तर दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात तापमानात वाढ होत राहील. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बुधवार ते शनिवार या काळात उत्तर भारतातील अनेक भागांत उष्ण वारे वाहतील. या उष्ण वाऱ्यांचा प्रभाव मध्य प्रदेशपासून बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागांपर्यंत राहील.