'अश्वगंधा’ कोरोनावर प्रभावी औषध ठरु शकते; IIT दिल्ली आणि जपानी संस्थेचा दावा
Ashwagandha, coronavirus (PC - Wikimedia Commons Pixabay)

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 96 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. देशात कोरोना बाधितांची आकडा झपाट्याने वाढत आहे. मात्र, अद्याप कोरोना विषाणुवर कोणतेही औषध किंवा लस (Vaccine) सापडलेली नाही. जगभरात कोरोना विषाणुला रोखणारी लस बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु आहे.

दरम्यान, सध्या आयुर्वेदाच्या माध्यमातून कोरोनावर उपचार शोधण्याचे संशोधन सुरु आहे. आयआयटी दिल्ली (IIT Delhi) आणि 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स इंडस्ट्रीयल सायन्स अ‍ॅंड टेक्नोलॉजी इन जपान' (National Institute of Advanced Industrial Science and Technology in Japan) यांच्या एकत्रित संशोधनातून 'अश्वगंधा' (Ashwagandha) हे आयुर्वेदिक औषध कोरोना व्हायरसवर परिणामकारक ठरत असल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा - Coronavirus Update: देशात गेल्या 24 तासात तब्बल 2 हजार 715 रुग्ण कोरोनामुक्त; भारत सरकारची माहिती)

या संशोधनानुसार, अश्वगंधा आणि ‘प्रोपोलीस’ (मधमाशीच्या पोळ्यात सापडणारा गोंद) यांच्या एकत्र मिश्रणामध्ये कोरोना विषाणुला प्रतिकार करण्याची क्षमता आहे. दिल्ली च्या जैव प्रौद्योगिकी विभागाचे प्रमुख डी सुंदर यांनी सांगितले की, हे संशोधन कोरोना विरोधातील लढाईसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. या संशोधनाचे प्रयोगशाळेत परीक्षण करणं गरजेचं आहे.