राफेल डील: अनिल अंबानी यांची रिलायन्स डिफेन्स कंपनी काँग्रेसविरोधातील ५ हजार कोटींचा मानहानीचा खटला घेणार मागे
अनिल अंबानी | (Photo Credits: PTI)

उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांची रिलायन्स डिफेन्स कंपनी (Reliance Defense Company) राफेल विमान खरेदी प्रकरणी अलाहाबाद न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेणार आहे. रिलायन्स समूहाने काँग्रेस नेते आणि नॅशनल हेरॉल्ड (National Herald) या दैनिकाविरुद्ध 5,000 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता. राफेल विमान खरेदी कराराबाबत नॅशनल हेरॉल्डमध्ये खोटी आणि अपमान करणारी माहिती छापल्याप्रकरणी अनिल अंबानी यांनी हा दावा दाखल केला होता. दरम्यान, आता हा खटलाच मागे घेणार असल्याची माहिती अंबानी यांचे वकील राकेश पारीख यांनी न्यायालयात दिली. सत्र न्यायाधीश पी. जे. तमकुवाला न्यायालयात या खटल्यावर सुनावणी सुरु होती.

नॅशनल हेरॉल्डचे वकील पी.ए. चम्पानेरी आणि इतर बचावकर्त्यांनी म्हटले आहे की, रिलायन्स समूहाचे वकील राकेश पारिख यांनी आम्हाला खटला मागे घेण्याबाबत माहिती दिली आहे. न्यायालयांच्या सुट्ट्या संपल्यानंतर खटला मागे घेण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल, असे नॅशनल हेरॉल्डच्या वकिलांनी म्हटले आहे.

राफेल विमान खरेदी घोटाळा प्रकरणाने लोकसभा निवडणूक 2019 प्रचारात चांगलीच रंगत आणली. जनता, राजकारण, संसद आणि सोशल मीडिया ते सर्वोच्च न्यायालय अशा विविध ठिकाणी राफेल व्यवहाराची चर्चा केली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप प्रणीत एनडीए सरकार विरोधात काँग्रेसने राफेल डील मुद्द्यावरुन जोरदार टीकास्त्र सोडत सत्ताधाऱ्यांचा देशभरात कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. (हेही वाचा, मनोहर पर्रिकर यांना राफेल कराराचा व्यवहार मान्य नसल्याने सोडले होते संरक्षण मंत्रीपद - शरद पवार)

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीने दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते सुनील जाखड, रणदीपसिंह सुरजेवाला, ओमन चांडी, अशोक चव्हाण, अभिषेक मनु सिंघवी, संजय निरूपम या नेत्यांचा समावेश आहे. तसेच, नॅशनल हेरॉल्ड आणि काही पत्रकारांविरोधातही या खटल्यात मानहानीचा आरोप करण्यात आला होता. अनिल अंबानी यांनी मोदींकडून राफेल कराराची घोषणा होण्याच्या दहा दिवस आधी रिलायन्स डिफेन्स ही कंपनी बनवली असा आशय असणारा एक लेख नॅशनल हेरॉल्ड दैनिकाने छापला होता. त्यावर आक्षेप घेत अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीने खटला दाखल केला होता.