
Amroha: पाळीव मांजरीचा मृत्यू झाल्याने तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे पूजा नावाच्या 32 वर्षीय महिलेने लाडक्या पाळीव मांजरीला गमावल्यामुळे हे टोकाचे पाउल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मांजरीचा मृतदेह पुन्हा जिवंत होईल या विश्वासाने तिने दोन दिवस तिचा मृतदेह स्वतःकडे ठेवला होता. परंतु दु:खात तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी पूजाच्या पाळीव प्राण्याचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या आईने मांजरीला दफन करण्याचा सल्ला दिला, तेव्हा तिने मांजरी पुन्हा जिवंत होईल असा आग्रह धरत नकार दिला. शनिवारी तिने घराच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत स्वत:ला बंद केले.
शंका आल्यानंतर आई तपासणीसाठी गेली असता ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली, मृत मांजर जवळच होती. दु:ख आणि एकटेपणाचा व्यक्तींवर किती गंभीर भावनिक परिणाम होऊ शकतो हे या घटनेने अधोरेखित केले आहे. हसनपूर येथे राहणाऱ्या पूजाचे आठ वर्षांपूर्वी दिल्लीतील एका व्यक्तीशी लग्न झाले होते, मात्र दोन वर्षांनंतर तिचा घटस्फोट झाला.तेव्हापासून ती आईसोबत राहत होती. एकाकीपणाशी झुंज देत तिने एक पाळीव मांजर दत्तक घेतलं, मांजर तिचं विश्व बनली होती.