नंबर प्लेटच्या सुरक्षेसाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ आल्या आहेत. 1 एप्रिलपासून वाहनांसाठी अशा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट- एचएसआरपी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नव्याने तयार होणाऱ्या वाहनांना आता अशा प्रकारच्या नंबर प्लेट्स बसवल्या जाणार आहेत. वाहनांची सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने डिसेंबर 2018 मध्ये वाहनांसाठी उच्च सुरक्षा क्रमांक पाट्या बसवण्याचा निर्णय घेतला होता. मुख्य म्हणजे जी जुनी वाहने आहेत त्यांनाही लवकरच या नंबर प्लेटसाठी सक्ती केली जाणार आहे.
या नव्या प्लेट्स कश्या असाव्यात याचे काही निकष ठरवण्यात आले आहेत. या प्लेट्सचा खर्च विकत घेतल्या जाणाऱ्या गाड्यांच्या खर्चामध्ये समाविष्ट केला जाईल. ही नंबर प्लेट राज्य शासनाने नियुक्त केलेल्या सेवापुरवठादारामार्फत नोंदणी प्राधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरटीओ कार्यालयाच्या परिसरात बसवण्यात येणार होत्या. मात्र अशाच प्रकारच्या नंबर प्लेट्सचा घोटाळा होऊ लागल्याने अखेर डीलरकडून विक्री होणाऱ्या सर्व वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ अनिवार्य करण्याची सूचना केली गेली. (हेही वाचा: वाहनांच्या 'नंबर प्लेट'संबंधी पाच महत्वाचे नियम)
1 एप्रिलपासून अशाप्रकारच्या प्लेट्स नसतील तर वाहनाची नोंदणी होणार नाही. एकदा का हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट्स वाहनांवर बसवल्या की त्या पुन्हा काढता येणार नाही. जुन्या वाहनांनाही डीलरच या नंबर प्लेट लावून देणार आहेत. ही प्लेट अॅल्युमिनिअमपासून तयार केली असून, यावर निळ्या रंगाच्या चक्राचे होलोग्राम आहे. तसेच वाहन क्रमांकाच्या काळ्या तिरप्या ओळीत ‘इंडिया’ असे इंग्रजीत लिहिलेले असणार आहे.