धक्कादायक! पैसे संपले म्हणून बायकोवर लावला जुगाराचा डाव; हरल्यावर मित्रांनी केला सामूहिक बलात्कार; तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांचा नकार
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh)  राज्यातील जौनपुर (Jaunpur) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय संस्कृतीची पुनरावृत्ती करत एका पतीने आपल्या पत्नीला जुगारात पणाला लावले. अखेर दुर्योधनासारखा हा पतीही जुगार हरला आणि आपली पत्नीही गमावून बसला. त्यानंतर या पत्नीवर त्याच्या मित्रांनी चक्क सामुहिक बलात्कार केला असल्याची तक्रार या पिडीतेने केली आहे. आपल्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार नोंदवण्यासाठी या महिलेने पोलीस स्टेशनचा दरवाजा ठोठावला होता, मात्र तिथे तिचे म्हणणे कोणीच ऐकून घेतले नाही. अखेर न्यायासाठी या महिलेने कोर्टात धाव घेतली आहे.

ही घटना जौनपुरच्या जफराबाद परिसर क्षेत्रातील आहे. पिडीतेच्या पतीला जुगार खेळण्याचे व्यसन होते. एके दिवशी मित्रांसमवेत जुगार खेळताना याच्याकडील सर्व पैसे संपले. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीलाही जुगारात पणाला लावले. त्यानंतर या महिलेवर सामुहिक बलात्कार झाला, या गोष्टीमुळे हादरून गेलेल्या महिलेने पतीचे घर सोडून माहेरी राहण्यास सुरुवात केली. शेवटी पतीने तिची मनधरणी करत, माफी मागून तिला परत आणले. मात्र त्यानंतरही त्याच्या दोन मित्रांनी या महिलेवर बलात्कार केला. (हेही वाचा: मुंबई: HIV ग्रस्त तरुणीवर सामूहिक बलात्कार; चारजणांविरोधात गुन्हा दाखल)

पोलिसांकडूनही या महिलेला मदत न मिळाल्याने, ही बाब न्यायालयाने गांभीर्याने घेतली आहे. या घटनेचा तपास करून, पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलिसांनी एफआयआरची प्रत कोर्टात सोपविण्याचेही आदेश दिला आहे. कोर्टाच्या या कारवाईनंतर महिलेला पुन्हा एकदा न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.