Delhi Shocker: पार्टीत दारू सोबत चखना दिला नाही म्हणून मद्यधुंद तरुणांनी चाकूने वार करून केली 28 वर्षीय तरुणाची हत्या
liquor | Representative Image | (Photo Credits: Pixabay)

Delhi Shocker: पार्टीत चखना न आणणं एका व्यक्तीला इतके महागात पडले की, यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. पार्टीत आलेल्या चार जणांनी एका व्यक्तीला चखना आणण्यास सांगितलं. या व्यक्तीने त्यांना चखना देण्यास नकार दिला. यावर मद्यपान करणारे इतके संतप्त झाले की त्यांनी त्या व्यक्तीला मारहाण करत चाकूने वार केले. या घटनेत 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

पीडित व्यक्तीवर चाकूने वार करणाऱ्या चारपैकी तिघांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र आणि त्याच्या मित्राचे कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या रिसेप्शनमध्ये मद्यपान करत असताना भांडण झाले. पोलिसांनी सांगितले की, चखना आणण्यास नकार दिल्याने जितेंद्रने आरोपींपैकी एकाला चापट मारली. त्यानंतर जितेंद्र एकटा असताना आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार केले. (हेही वाचा - Assam Shocker: गुवाहाटी येथे डॉक्टर दाम्पत्याचे 4 वर्षांच्या 'दत्तक' मुलीवर अमानुष अत्याचार; पोलिसांकडून अटक)

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी या घटनेबाबत फोन आला. पोलिसांना माहिती मिळाली की जितेंद्रवर चाकूने वार करण्यात आले. त्यानंतर त्याला संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. घटनास्थळी पोलिसांचे एक पथक तात्काळ पाठवण्यात आले. या घटनेत जितेंद्र गंभीर जखमी झाल्या, ज्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

जितेंद्रची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी एफएसएल पथक आणि गुन्हे पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीला आम्ही आयपीसीच्या कलम 307 हत्येचा प्रयत्न अंतर्गत या संदर्भात एफआयआर नोंदवला होता.

पोलिसांनी सांगितले की, अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यांना जितेंद्र आणि इतर चार जणांमध्ये भांडण झाल्याचे दिसून आले. दरम्यान, जितेंद्रचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जयपूर गोल्डन हॉस्पिटलमधून पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजवरून सर्व आरोपींची ओळख पटल्यानंतर गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. चारही आरोपींची ओळख पटली असून तिघांना अटक करण्यात आली आहे. यातील फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.