एका डॉक्टर जोडप्याला (Doctor Couple) गुवाहाटी शहर पोलिसांनी (Guwahati City Police) अटक केली आहे. दत्तक घेतलेल्या चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि जनरल सर्जन असलेला पती डॉ वल्लीउल इस्लाम याला आसामच्या राजधानीतील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतल्याच्या एका दिवसानंतर पोलिसांनी शनिवारी रात्री त्याची पत्नी मनोचिकित्सक संगीता दत्ताला मेघालयच्या रि-भोई जिल्ह्यातून अटक केली.
पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध पलटण बाजार पोलीस ठाण्यात आयपीसी आणि बाल न्याय कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस उपायुक्त (मध्य) नंदिनी काकती यांनी सांगितले की, एका 4 वर्षीय अल्पवयीन मुलीचे हात गच्चीवरील खांबाला बांधले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अल्पवयीन मुलीची सुटका केली. (हेही वाचा: Satara Sexual Crime: तेरा वर्षांच्या शाळकरी मुलीला विकले, लॉजवर नेऊन अत्याचार; सातारा येथील खळबळजन घटना)
सुरुवातीला, डॉक्टर जोडप्याने सांगितले की ही मुलगी त्यांचीच मुलगी आहे, पण तपासादरम्यान पोलिसांना आढळले की या मुलीला दत्तक घेतले आहे. पोलिसांनी जेव्हा या अल्पवयीन मुलीची सुटका केली तेव्हा त्यांना तिच्या शरीरावर अनेक जखमाही आढळल्या तसेच तिच्या अंगावर जाळण्याच्या खुणाही होत्या. या मुलीने पोलिसांना सांगितले की, तिच्यावर या जोडप्याने अत्याचार केला होता.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मोलकरीण लक्ष्मी हिलाही पोलिसांनी अटक केली आहे. बाल हक्क कार्यकर्ते मिगुएल दास क्वेह म्हणाले की, डॉक्टर जोडप्याने त्यांच्या दत्तक मुलीशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारी पूर्वी आल्या होत्या. मात्र, त्यावेळी कोणताही पुरावा नव्हता. तपासादरम्यान पोलिसांना इतरही अनेक तक्रारी आढळून आल्या आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की त्यांनी आरोपी जोडप्याला अटक केली असून पोलीस तपास सुरू आहे.