धक्कादायक! पगाराच्या बदल्यात तरुणीकडे शारीरिक संबंधाची मागणी, नकार दिल्यावर केली जबर मारहाण (Video)
तरुणीला मारहाण (संग्रहित-संपादित प्रतिमा)

पगाराच्या बदल्यात शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या, सलून मालकाला आणि त्याच्या मित्रांना नकार दिल्याने तरुणीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना ग्रेटर नोएडा (Greater Noida) येथे घडली आहे. याबाबत तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी सलूनचा मालक, वसीम (रा. नोएडा सेक्टर -12) याला ताब्यात घेतले आहे. नॉलेज पार्क II येथील, व्हीनस युनिसेक्स सलूनमध्ये मार्च महिन्यापासून ही तरुणी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होती. बरेचवेळा पगाराबाबत विचारणा करूनही या तरुणीला पगार दिला गेला नाही, शेवटी पगाराच्या बदल्यात शारीरिक संबंधाची मागणी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यापासून व्हीनस युनिसेक्स सलूनमध्ये या तरुणीने मासिक 17,000 पगारावर काम करण्यास सुरुवात केली. अद्याप या तरुणीला पगार दिला गेला नव्हता. याबाबत तिने वेळोवेळी विचारणा करूनही उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. शेवटी शनिवारी तिला पगार नेण्यासाठी बोलावण्यात आले. तिथे गेल्यावर वसीमचा मित्र शेरा याने या तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या तरुणीने नकार दिला व ती तिथून बाहेर पडली. यामुळेच वसीमसह त्याच्या इतर मित्रांनी या तरुणीला मारहाण करायला सुरुवात केली. (हेही वाचा: 400 रुपये घेऊन बलात्कार प्रकरणातील संशयितांना सोडून दिले; दोन पोलीस निलंबित)

तरुणीचे केस पकडून तिला सलूनच्या बाहेर काढले, आणि भररस्त्यात तिला काठ्याने मारण्यास सुरुवात केली. या मालाकांसोबत तिच्या सहकाऱ्यांनीही तिला मारहाण केली. शेवटी जमा झालेल्या काही लोकांनी या तरुणीला सोडवले. त्यानंतर तिने तडक पोलीस स्टेशन गाठले व घडलेली हकीकत सांगितली. मात्र पोलिसांनी त्यावर कोणतीही तडक कारवाई केली नाही. शेवटी सोमवारी संध्याकाळी पोलिसांनी वसीमला अटक केली.