भारतीय लष्कराने (Indian Army) पुन्हा एकदा सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. नियंत्रण रेषेच्या नौशेरा (Naushera) सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचा (Terrorist) मोठा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आणि पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले. गेल्या दोन दिवसांतील घुसखोरीचा हा दुसरा मोठा प्रयत्न असून, तो लष्कराने हाणून पाडला आहे. रविवारी भारतात आत्मघाती हल्ला करण्यासाठी आलेल्या एका दहशतवाद्याला नियंत्रण रेषेवर झालेल्या चकमकीनंतर लष्कराने जेरबंद केले.भारतीय लष्कराचे जम्मू स्थित प्रवक्ते कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22-23 ऑगस्टच्या मध्यरात्री दहशतवाद्यांनी नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.
एलओसीवर तैनात असलेल्या सतर्क भारतीय जवानांनी ही घुसखोरी हाणून पाडली. भारतीय जवानांची घुसखोरांशी चकमकही झाली. सकाळी नियंत्रण रेषेच्या सर्वसाधारण भागात क्वाडकॉप्टर (ड्रोन) द्वारे सखोल शोध मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी नियंत्रण रेषेजवळ दोन दहशतवाद्यांचे मृतदेह पडलेले आढळले. दुपारपर्यंत ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण परिसरात लष्कराची सखोल शोधमोहीम सुरू होती.
रविवारीही नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत पाकिस्तानी दहशतवादी तबराक हुसेन जखमी झाला होता. विशेष म्हणजे तबराक हुसेनला दुसऱ्यांदा भारतात पकडण्यात आले. यापूर्वी 2016 मध्ये त्याला अटक करून 26 महिने तुरुंगवास भोगल्यानंतर पाकिस्तान सरकारच्या ताब्यात देण्यात आले होते. हेही वाचा BJP Suspends MLA T Raja Singh: भाजप आमदार टी. राजा पक्षातून निलंबित; प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यानंतर झाली होती अटक
रविवारी नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करत असताना भारतीय लष्कराने तबराक हुसेनला पकडले तेव्हा तो इथे मरण्यासाठी आलो आहे, असे ओरडू लागला. भारतीय लष्कराने झाडलेल्या गोळीमुळे तबरेक जखमी झाला. अटकेच्या वेळी तो ड्रग्जचा डोसही घेत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात असे आढळून आले की, त्याने नुकतेच त्याच्या छातीचे, काखेचे आणि शरीराच्या खाजगी भागाचे केस मुंडले होते. आत्मघाती हल्ल्यापूर्वी इस्लामिक जिहादी हेच करतात.