धक्कादायक : मंदिरातील प्रसाद खाल्ल्याने 13 जणांचा मृत्यू; जाणूनबुजून विषबाधा केल्याचा अंदाज
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook)

कर्नाटकातील म्हैसूरजवळच्या चामराजनगर जिल्ह्यात, सुलवाडी गावामध्ये विषबाधा होऊन तब्बल 13 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंदिरातील प्रसाद खाल्यानंतर ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या प्रसादामुळे अजून 80 जणांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात असून, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांपैकी 12 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सुलवाडी किच्चुगुट्टी मरम्मा मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून 'व्हेज पुलाव' देण्यात आला होता, त्यानंतर त्यातून ही विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गावात देवीचा उत्सव होता, देवीच्या महाप्रसाद घेतल्यानंतर भाविकांना अचानकपणे उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर भाविकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल 80 लोकांना हा प्रसाद खाल्ल्यामुळे त्रास झाला. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर प्रसादामधून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. लगोलग ही बातमी चहूकडे पसरल्याने परिसरात खळबळ माजली. कर्नाटक राज्य सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेत गावामध्ये तातडीने 5 वैद्यकीय पथक पाठवण्याचा आदेश देण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत. गावातील दोन गटांतील भांडणामुळे जाणूनबुजून ही विषबाधा केली गेली असल्याचा अंदाज जिल्ह्यातील मंत्र्यांनी वर्तवला आहे. शासकीय तसेच खाजगी विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार चालू आहेत.

दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई कर्नाटक सरकारकडून करण्यात आली आहे.