प्रयागराज कुंभमेळ्यात सलग तिसऱ्या दिवशी विश्वविक्रम; तब्बल 10 हजार लोकांनी केली स्वच्छता
कुंभमेळा स्वच्छता (Photo Credit : Facebook)

उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे कुंभमेळा (Kumbh Mela) पार पडत आहे. युपी सरकारने जातीने लक्ष घातलेला हा कुंभमेळा बऱ्याच कारणांनी चर्चेत राहिला. पहिल्यांना किन्नर आखाडा सामील होण्यापासून अनेक राजकारणी लोकांनी या कुंभमेळ्याला भेट दिली. कुंभमेळा संपत आलेला असताना याचे नाव संपूर्ण जगात होत आहे, ते या कुंभमेळ्याने केलेल्या काही विश्वविक्रमामुळे. आज सलग तीन दिवस हे विश्वविक्रम होत आहेत. आज तब्बल दहा हजार लोकांनी स्वच्छतेचे काम करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) मध्ये आपले नाव कोरले. आरोग्य विभाग आणि मेळ्याचे प्रशासन यांनी याचे आयोजन केले होते.

15 जानेवारीला सुरु झालेला हा महाकुंभ 4 मार्चपर्यंत चालणार आहे. 1 मार्च रोजी कुंभमेळा सेक्टर 1 मध्ये हजारो विद्यार्थी आणि नागरिकांनी एका मोठ्या भिंतीवर आपल्या हाताचे ठसे उमटवून ‘जय गंगे’ थीम असलेली पेंटिंग बनवली. ही घटना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील करण्यात आली. याआधी सियोल (साउथ कोरिया) मध्ये 4675 लोकांनी अशी भिंतीवरील पेंटिंग बनवली होती. त्याआधी 28 फेब्रुवारी रोजी एकाच वेळी 510 बसचे एकाच मार्गावर संचलन करण्याचा जागतिक रेकॉर्ड केला गेला. (हेही वाचा: पहा उपग्रहातून कसा दिसतो कुंभमेळा; ISRO ने काढला सॅटेलाईटद्वारे फोटो)

त्यानंतर आज एकाचवेळी तब्बल दहा हजार लोकांनी या कुंभमेळ्याच्या जागेची स्वच्छता करून नवीन रेकॉर्ड बनवला आहे. आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनीदेखील या कार्यात आपला सहभाग नोंदवला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक निर्णायक मंडळाच्या टीमच्या देखरेखीखाली हा कार्यक्रम पार पडला. प्रयागराज (अलाहबाद), हरिद्वार, नाशिक आणि उज्जैनमधील नदीतीरी दर 12 वर्षात तीन तीन वर्षांच्या अंतराने कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. मकरसंक्रांतीच्या दिवशी तब्बल 2 करोड भाविकांनी गंगास्नान केले होते. या वर्षीचा कुंभमेळा भव्य स्वरूपात होण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने बराच खर्च करून अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.