Delhi Airport Roof Collapse: दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 वर छत कोसळल्याने 1 ठार; 6 जण जखमी
Delhi Airport Roof Collapse (PC -ANI)

Delhi Airport Roof Collapse: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-1 (Indira Gandhi International Airport Terminal 1) वर छत कोसळले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, छत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, विमानतळाच्या टर्मिनल-1 चे छत कोसळल्याची माहिती सकाळी 5.30 च्या सुमारास मिळाली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या.

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना 20 लाख नुकसान भरपाई -

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी विमानतळावर जाऊन अपघातस्थळाची पाहणी केली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना 20 लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जखमींना सरकार 3 लाख रुपयांची मदत देणार आहे. जो भाग कोसळला तो 2009 मध्ये बांधण्यात आल्याचेही मंत्र्यांनी सांगितले. (हेही वाचा - Delhi Airport Roof Collapse: दिल्ली विमानतळावर Terminal 1 वरून झेपावणारी विमानं दुपारी 2 पर्यंत बंद; DGCA कडून प्रवासांची गैरसोय टाळण्यासाठी महत्त्वाच्या सूचना!)

छत कोसळण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार -

दिल्ली विमानतळ टर्मिनल वन येथे झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एक पथक तयार केले आहे. हे पथक अपघाताची चौकशी करणार आहे. आज सकाळी झालेल्या अपघातावर नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू स्वतः लक्ष ठेवून आहेत. छत कोसळल्याने काही गाड्यांचेही नुकसान झाले आहे. समोर आलेला व्हिडीओ पाहता, छत पडल्यामुळे गाड्यांचा चुराडा झाल्याचे दिसत आहे.

पहा व्हिडिओ - 

डीसीपी उषा रंगनानी यांनी सांगितले की, आज पहाटे 5 वाजता, IGIA (देशांतर्गत विमानतळ) टर्मिनल 1 च्या बाहेरील निर्गमन गेट क्रमांक 1 ते गेट क्रमांक 2 पर्यंत विस्तारित शेड कोसळली. ज्यामध्ये सुमारे 4 वाहनांचे नुकसान झाले असून सुमारे 6 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी दिल्ली पोलिस, अग्निशमन सेवा, सीआयएसएफ आणि एनडीआरएफच्या तुकड्या हजर आहेत.

तथापी, शुक्रवारी पहाटे दिल्ली आणि एनसीआरमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. आयएमडीने पुढील सात दिवस दिल्लीत सामान्यतः ढगाळ आकाश आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 29 जून रोजी हवामान थोडे थंड राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहील. शहरात हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान 30-40 किमी/तास वेगाने वारे वाहतील. 30 जून रोजी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.