शुक्रवार आला की चित्रपट प्रेमींना उत्सुकता असते ती त्या आठवड्यात बॉक्स ऑफिस वर कोणते चित्रपट रिलीज होत आहेत याची. या आठवड्यातही चित्रपटांची रेलचेल आहे. वेगवेगळ्या धाटणीचे आणि विषयांचे तब्बल 3 चित्रपट या आठवड्यात रिलीज होत आहेत.
1. लाल कप्तान (Laal Kaptaan)
नवदीप सिंह दिग्दर्शित सैफ अली खानचा (Saif Ali Khan) हा बऱ्याच दिवसांपासून गाजत असलेला चित्रपट आहे. या चित्रपटातला सैफचा लुक हा विशेष चर्चेचा विषय ठरला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच प्रेक्षकांच्या मनात त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात 18 व्या शतकात बुंदेलखंड येथे बक्सरच्या युद्धानंतरच्या पार्श्वभूमीवर ही कथा आकार घेते. हा चित्रपट एक रिवेंज ड्रामा आहे. सैफ अली खानने यात नागा साधूची भूमिका केली आहे. सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), दीपक डोब्रियाल (Deepak Dobriyal), झोया हुसेन ((Zoya Hussain) यांच्या यात सहाय्यक भूमिका आहेत. तर मानव वीज खलनायाच्या भूमिकेत आहे. (हेही वाचा. सैफ अली खान पुन्हा एकदा वेब सिरीजमध्ये; अली अब्बास झफरसोबत करणार 'तांडव')
2. घोस्ट (Ghost)
हॉरर आणि थ्रिलर चित्रपटांचा हातखंडा असलेला विक्रम भट (Vikram Bhatt) अजून एक हॉरर चित्रपट घेऊन या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात टेलिव्हिजन स्टार सनाया इराणी आणि शिवम भार्गव यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही कथा युके (United Kingdom) मध्ये वास्तव्यास असणाऱ्या पत्नीच्या खुनाचा आरोप लावला गेलेल्या भारतीय वंशाच्या एका राजकारणी व्यक्तीची आहे. हा खून त्याने केलेला नसून एका आत्म्याने केलेला आहे, असे सांगितल्यानंतर घडणाऱ्या घटना म्हणजे उर्वरित चित्रपट आहे.
3. यारम (Yaaram)
ओवेस खान दिग्दर्शित या चित्रपट इतर चित्रपटांच्या तुलनेत प्रमोशनच्या बाबतीत जरा मागे पडला असला तरीही चित्रपटाने निवडलेल्या विषयामुळे तो लक्षवेधी ठरू शकतो. अर्थात सिनेमाची हाताळणी कशी आहे यावर त्याचं यश अवलंबून आहे. हा चित्रपट 'ट्रिपल तलाक' आणि 'निकाह हलाला' नाजूक मुद्द्यांवर भाष्य करू इच्छितो. या चित्रपटाची मांडणी मात्र काहीशी विनोदी आहे. यात प्रतीक बब्बर, सिद्धांत कपूर आणि इशिता राज यांच्या मुख्य भूमिका आहेत.