भाजप विरोधात उभे ठाकले तब्बल 600 कलाकार; भाजप आणि मित्रपक्षांना मतदान न करण्याचे आवाहन
Naseeruddin Shah (photo credits file Image)

देशात भाजपविरोधी लाटेची उंची किती वाढली आहे, हे नुकत्याच घडलेल्या एका प्रकारावरून समजून येते. सामान्य जनतेचा भाजपवरचा विश्वास उडत आहेच, त्यात आता देशभरातील जवळपास 600 नाट्य कलाकार भाजप सरकारविरोधात एकवटले आहेत. अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) आणि अभिनेत्री रत्ना पाठक-शाह, दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा, अमोल पालेकर, डॉली ठाकोर, लिलिएट दुबे  यांसारख्या तब्बल 600 कलाकारांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान न करण्याचे आवाहन केले आहे.

या कलाकारांनी एक पत्रक काढले आहे, ज्यामध्ये ‘कट्टरता, द्वेष आणि उदासीनतेला सत्तेपासून दूर ठेवा’ असे नमूद करण्यात आले आहे. या पत्रकाद्वारे सामान्य जनतेला भाजप पक्षाला मतदान न करण्याचे आवाहन केले गेले आहे. या पत्रकाखाली नसरुद्दीन शहा, रत्ना पाठक-शहा, अमोल पालेकर, अनुराग कश्यप, कोंकणा सेन शर्मा, गिरीश कर्नाड, महेश एलकुंचवार, डॉली ठाकोर, लिलिएट दुबे, अभिषेक मजुमदार, संजना कपूर आणि इतर 616 कलाकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (हेही वाचा: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उर्मिला मातोंडकर बनली 'रिक्षाचालक' (Photos))

हिंदी, इंग्रजी, तामिळ, बंगाली, मराठी, मलयालम, कन्नड़, आसामी, तेलुगू, पंजाबी, कोकणी आणि उर्दू अशा 12 भाषांमध्ये हे पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकात लिहिण्यात आले आहे - आगामी लोकसभा निवडणुका या देशातील सर्वात महत्वाच्या निवडणूक आहेत. आज या देशात गीत, नृत्य, हास्य धोक्यात आले आहे. तर्क, वादविवाद आणि असहमत यांचा विकास होत असलेल्या संस्थांची सरकारने गळचेपी केली आहे. कोणतीच लोकशाही ही प्रश्न आणि  वादविवाद यांच्याशिवाय कार्य करू शकत नाही, मात्र या सर्वांना सध्याच्या सरकारने पायाखाली दाबून ठेवले आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि सर्वसमावेशक भारतासाठी मतदान करा, भाजप आणि त्याच्या सहयोगींविरोधात मत द्या. भाजपला सत्तेतून बाहेर काढा.’