Vikram Gokhale Health Update: विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त अफवा; प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याची पत्नीची माहिती
Vikram Gokhale | PC: Twitter/Ajay Devgan

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhle) यांची प्रकृती खालावल्याचं वृत्त काल (23 नोव्हेंबर) दुपारी आल्यापासून अनेकांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली आहे. अशातच रात्री उशिरा विक्रम गोखले यांनी अखेरचा श्वास घेतला सांगत निधनाचं वृत्तही वायरल झालं होतं. पण विक्रम गोखले यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे आणि त्यांच्या निधनाचं वृत्त निव्वळ अफवा असल्याचं त्यांच्या पत्नीकडून देण्यात आलं आहे. ईटी टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, 'विक्रम गोखले यांच्या पत्नीनी हेल्थ अपडेट देताना त्यांना हृद्य आणि मूत्रपिंडाचा त्रास आहे. मागील काही दिवसांत त्यांचे अवयव निकामी होत आहे. काल रात्रीपासून ते स्पर्शाला प्रतिसाद देत नाहीत डॉक्टर गुरूवारी सकाळी पुढील निर्णय घेणार आहेत.'

दरम्यान विक्रम गोखले हे कोमा मध्ये असून व्हेंटिलेटर सपोर्ट वर आहेत. 5 नोव्हेंबर पासून त्यांच्यावर पुण्यात दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. 77 वर्षीय विक्रम गोखले हे उपचाराधीन असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. विक्रम गोखले यांच्यासोबत त्यांच्या पत्नी वृषाली आणि दोन्ही मुली आहेत.

लॉकडाऊनच्या काळामध्ये विक्रम गोखले मुंबई मधून पुण्यामध्ये शिफ्ट झाले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी ते मराठी मालिका 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेमध्ये झळकले होते. मराठी सिनेमा, नाटकं यांच्यासोबतच हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत. हम दिल दे चूके सनम, भूल भूलैय्या, हिचकी अशा सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. मराठी सिनेमांमध्ये अलिकडे गोदावरी, नटसम्राट मध्ये ते झळकले आहेत. गोदावरी हा त्यांचा मागील आठवड्यातच रिलीज झालेला सिनेमा आहे.

काल रात्री विक्रम गोखलेंच्या निधनाचं वृत्त वायरल होताच अनेक कलाकारांनीही सोशल मीडीयामध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पण अद्यापही ते मृत्यूशी झगडा करत आहेत.