आपल्याकडे मालिकांचा प्रेक्षकवर्ग फार मोठा आहे. मालिका इतक्या समरसतेने पाहिल्या जातात की, त्यातील पात्र अनेकदा घरातीलच होऊन जातात. त्यांची सुख-दुःखे आपली वाटू लागतात. अनेकदा वेळ न मिळाल्यामुळे मालिका पाहायला अॅपचा आधार घेतला जातो. रिपीट टेलिकास्ट बघणाऱ्यांची संख्याही थोडी नाही.
बरेचदा मालिकेतील एखादा ट्रॅक आवडला नाही तरी नाक मुरडतील पण मालिका पाहतील, अशी आपल्याकडील अवस्था. त्यामुळे नवनव्या मालिका, कार्यक्रम सादर करण्याचा वाहिन्यांचा उत्साहही कायम असतो. अशातच आता काही नव्या मालिका, कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. तर जाणून घेऊया त्याविषयी...
गाव गाता गजाली
'गाव गाता गजाली' ही झी मराठीवरील लोकप्रिय मालिका. अल्पशा विश्रांतीनंतर ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. गणेशोत्सवानिमित्त चाकरमानी कोकणात जातात पण यंदा कोकणच तुमच्या भेटीला येणार आहे. मग १३ सप्टेंबरपासून बुध-शनि रात्री १० वाजता झी मराठीवर पाहा गाव गाता गजाली.
तू अशी जवळी रहा
नव्या धाटणीची नवी प्रेमकथा घेऊन झी युवा सज्ज झालं आहे. मालिकेचं नाव आहे 'तू अशी जवळी रहा.' त्याचा वेड्या प्रेमाला ती जिंकू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला १ ऑक्टोबरपासून सुरु होणारी ही मालिका पाहावी लागेल. सोम-शनि संध्याकाळी ७-३० वाजता फक्त झी युवावर.
अस्सल पाहुणे इरसाल नमुने
'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' हा आगळावेगळा कार्यक्रम कलर्स मराठी आपल्या भेटीला घेऊन येत आहे. पाहुणे अचानक येवोत किंवा कळवून... तुम्ही त्यांच स्वागत कसं करता? पाहुण्यांचे एकापेक्षा एक नमुने दाखवणार हा कार्यक्रम आहे. २० सप्टेंबरपासून गुरु-शुक्र रात्री ९-३० हा कार्यक्रम तुम्हाला कलर्स मराठीवर पाहायला मिळेल.
सूर राहू दे
'सूर राहू दे' ही नवी मालिका लवकरच झी युवावर सादर होणार आहे. दोन अगदी भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची ही प्रेमकथा आहे. पैशापलिकडलं प्रेम दाखवणारी ही मालिका १ ऑक्टोबरपासून सोम-शनि संध्याकाळी ७ वाजता तुम्हाला पाहायला मिळेल.
बिग बॉस सीजन १२
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'बिग बॉसचा १२' वा सीजन येत्या रविवारपासून सुरु होत आहे. लोकप्रिय ठरलेल्या या कार्यक्रमाच्या नव्या सीजनमध्ये नेमके काय काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. तर १६ सप्टेंबरपासून रोज रात्री ९ वाजता कलर्स टीव्ही वर बिग बॉस आपल्या भेटीला येत आहे.