हिंदी टेलीव्हिजन क्षेत्रातील एक लोकप्रिय कॉमेडी शो म्हणून, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) कडे पहिले जाते. तब्बल 10 वर्षे हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सध्या या शोमध्ये दयाबेन नावाची मध्यवर्ती भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीने हा शो सोडल्यामुळे, हा शो सध्या चर्चेत आहे. मात्र आता मराठी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो आता मराठीमध्ये येऊ घातला आहे. 'गोकुलधामची दुनियादारी' (Gokuldhamchi Duniyadari) या नावाने ‘फक्त मराठी’ वाहिनीवर हा शो प्रसारित होणार आहे. नुकताच या मराठी शोचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.
गोकुलधामची दुनियादारी शोचा प्रोमो -
'गोकुलधामची दुनियादारी' हे मूळ शोचे डब व्हर्जन असणार आहे. 24 डिसेंबरपासून, सोमवार ते शनिवार रोज रात्री 9 वा. या मालिकेचे प्रसारण होणार आहे. 'गोकुळधाम सोसायटी’ ही 4 विंग असलेली, गोरेगाव पूर्व, मुंबईच्या पावडर गल्लीतील एक काल्पनिक निवासी संस्था आहे. हा शो मुख्यत: इथे राहणाऱ्या कुटुंबाभोवती फिरत राहतो. जेठालाल, दयाबेन, तारक मेहता, भिडे मास्तर, डॉ हाथी, रोशनसिंग सोढी, पत्रकर पोपटलाल आणि टप्पू सेना अशा भूमिका या शोमुळे लोकप्रिय ठरल्या आहेत. (हेही वाचा: टीव्ही शो 'तारक मेहता... मध्ये परत येणार नाही तुमची लाडकी दयाबेन, ही अभिनेत्री घेणार तिची जागा)
28 जुलै 2008 रोजी छोट्या पडद्यावर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो सुरु झाला होता. आतापर्यंत या शोचे 2800 हून अधिक भाग प्रसारित झाले आहेत, ज्यामुळे हा जगातील सर्वाधिक जास्त काळ चालणारा कॉमेडी शो बनला आहे. आता हा शो मराठीमध्ये येत असल्याने ‘तारक मेहता...’ च्या मराठी प्रेक्षकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.