Tanmay Vekaria (Photo Credits: YouTube)

कोरोना व्हायरसचे भारत देशातील संकट दाहक रुप धारण करु लागले आहे. महाराष्ट्र राज्यात विशेषतः मुंबईत कोरोनाचा प्रभाव अधिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मुंबई महानगरपालिका महत्त्वपूर्ण उपाययोजना राबवत आहे. कोरोनाचे रुग्ण आढळलेली ठिकाणं, इमारती, हॉस्पिटल्स सील करण्यात आली असून त्यांना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अंकिता लोखंडे, शिवीन नारंग, अशिता धवन यांच्यासह काही सेलिब्रेटींच्या इमारतीत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर संबंधित इमारती सील करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम तन्मय वेकारिया (Tanmay Vekaria) राहत असलेली इमारतही सील करण्यात आली आहे. त्या इमारतीत 3 जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती स्पॉटबॉय या वेबपोर्टलने दिली आहे.

तन्मय वेकारिया हा सब टीव्हीवरील तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत 'बाघा' ही भूमिका साकरत आहे. राज आर्केड (Raj Arcade) या कांदवली पश्चिम येथील इमारतीत तो राहतो. ही इमारत सील करण्यात आली असून सध्या BMC च्या देखरेखीखाली आहे. खुद्द तन्मय वेकरिया या वृत्ताची पृष्टी केली आहे. विशेष म्हणजे या इमारतीमध्ये आढळलेल्या कोरोना रुग्णांना कोणतीही ट्रव्हल हिस्ट्री नाही. म्हणजेच हे तिघेही परदेशात गेले नव्हते. (अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या सोसायटीमध्ये कोरोना रुग्ण: प्रशासनाकडून इमारत सील)

मंगळवार पासून संपूर्ण इमारत 14 दिवसांसाठी सील करण्यात आली आहे. त्यामुळे इमारती बाहेर जाण्याची किंवा इमारतीत येण्याची कोणालाही परवानगी नसल्याची माहिती तन्मयने दिली आहे. "सध्या या तिन्ही रुग्णांवर अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मी करतो," अशा भावना अभिनेता तन्मय वेकारिया याने व्यक्त केली आहे.