अल्पावधीत सर्व प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली झी मराठी लोकप्रिय मालिका 'स्वराज्य रक्षक संभाजी' (Swarajya Rakshak Sambhaji) लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे हे त्यांच्या चाहत्यांना कळताच त्यांच्या चाहत्यांच्या पायाखालची जमिनीच सरकली. हा धक्का जितका या मालिकेच्या प्रेक्षक वर्गासाठी सहन होणारा नव्हता तितकाच तो या मालिकेच्या कलाकारांसाठीही. संभाजी राजे यांची भूमिका साकारणारे मालिकेतील प्रमुख कलाकार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांचाही ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय या विचाराने अश्रूंचा बांध फुटला. त्यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत खंत व्यक्त केली.
मालिकेतील सर्व कलाकारांनी वढू बुद्रूक गावातील महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. यावेळी मालिकेबद्दल बोलताना अमोल कोल्हे यांच्या अश्रुंचा बांध फुटला. “खरंतर नेमकं काय बोलायचं तेच सुचत नाहीये. पहिल्यांदाच अडखळलो असेन. पण एक स्वप्नपूर्ती आहे. माझ्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. एक स्वप्न घेऊन गेली आठ-नऊ वर्षे आम्ही सगळे धडपडत होतो. झी मराठी वाहिनीचे आभार मानतो. काही चुकलं असेल तर माफ करा. काही राहून गेलं असेल तर जिवात जीव असेपर्यंत ते पूर्ण करण्याआधी कायम कटीबद्ध राहीन”, असे उद्गार त्यांनी काढले.
पाहा तो भावूक क्षण:
गेली जवळपास दोन वर्षं या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं. मालिकेचा शेवटचा एपिसोड नुकताच गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. त्यामुळे नव्या मालिकेची जितकी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असेल तितकेच दु:ख स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपणार असल्याचे असेल.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर, तसेच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका, तसेच शंतनू मोघे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसुबाईंची भूमिका यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.