![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/10/2019-10-13-1-1-380x214.jpg)
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले (Ratris Khel Chale 2) मालिकेचे दुसरे पर्व सुरुवाती पासूनच भन्नाट गाजत आहे. या मालिकेतील शेवंता (Shevanta) तर आता जवळपास सर्वांच्याच गळ्यातील ताईत झाली आहे, आजवर आपण या शेवंताला अनेकदा मादक रूपात पाहिले असेल, पण सध्या समोर येणाऱ्या काही खास फोटोंमध्ये शेवंता चक्क आपल्या हाताने चिकन बनवताना दिसत आहे . झालं असं की, रात्रीस खेळ चाले 2 च्या सेटवर नुकतेच दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) आणि नृत्य दिगर्शक उमेश जाधव (Umesh Jadhav) यांनी भेट दिली त्यावेळी त्यांच्यासोबत मजामस्ती करत सेटवरच अचानक चिकन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमाळकर हिने सुद्धा याच पार्टीसाठी चिकन बनवताना आणि नंतर टीमसोबत त्यावर ताव मारतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
अपूर्वाने शेअर केलेल्या फोटोमध्ये सीरियल मधील काही पात्र जसे की, शोभा,दत्ता आणि सोबतच प्रमुख पाहुणे संजय जाधव व उमेश जाधव देखील पाहायला मिळत आहेत. या फोटो खाली अपूर्वाने आमच्या सेटवर रविवारचे निमित्त साधून अशी चिकन पार्टी झाली असे कॅप्शन दिले आहे.
अपूर्वा नेमाळकर इंस्टाग्राम पोस्ट
वास्तविक मालिकेत आपण पाहिले असेल की यातली बरीचशी पात्र कमीअधिक प्रमाणात एकमेकांविरुद्ध कट रचणारी आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी शेवंता आणि वच्छीचा एकत्र व्हायरल डान्स असो वा आता समोर आलेले हे चिकन पार्टीचे क्षण,यातून खऱ्या आयुष्यात या टीमचे बॉण्डिंग अफलातून असल्याचे दिसून येते.
दरम्यान, मालिका आता रंजक वळणावर आली आहे. शेवंता आणि अण्णांच्या संबंधाबद्दल कळल्यामुळे पाटणकर विहिरीत जीव देतात त्यानंतर काही दिवस शेवंता उदास दिसून येते, त्यामुळे प्रेक्षकांना कुठेतरी शेवंताला पासचताप होतोय की काय असे वाटायला लागते पण मागील दोन दिवस दाखवलेल्या भागात पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता पूर्वीप्रमाणे लपून छपून भेटताना दिसतात, त्यामुळे नेहमीप्रमाणे प्रेक्षक आता पुढे काय हा प्रश्न घेऊन मालिका बघत आहेत.